…होय मी भटकती आत्मा; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

0

पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, मी शरद पवारांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो, असे मोदी म्हणतात. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) टीकेला प्रत्युत्तर दिले. सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मोदी म्हणतात की, मी तडफड करतो. होय, मी लोकांचं दु:ख पाहून तडफडतो. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान काल म्हणाले मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय, असे शरद पवार यांनी म्हटले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आयुष्यात सर्वप्रथम शिवनेरी किल्ल्यावर यशवंतराव चव्हाणांना पाहिलं: शरद पवार

1960 साली मी पुण्यात शिक्षण घेत होतो. यशवंतराव चव्हाण साहेबांबद्दल मला प्रचंड आदर होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. हे मराठी राज्य व्हावं यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. तो दिवस होता 1 मे 1960. त्यावेळी आम्ही विद्यार्थी होतो, या चळवळीत आम्ही मोठ्या संख्येने सहभागी होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण शिवनेरी वर येऊन घोषणा करतील आणि मग पंतप्रधान मुंबईमध्ये अधिकृत घोषणा करतील. ही बातमी आम्हाला समजताच, आम्ही सगळे शिवनेरी आलो. आयुष्यातील पहिल्यांदा मी शिवनेरीवर आलो, त्यावेळी प्रथमतः यशवंतराव चव्हाणांना आम्हाला पाहता आलं. हे आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. पुढं याचं महाराष्ट्राचे नेतृत्व करायला मिळालं. साल होतं 1967, त्यापुढं मी 14 वेळा निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्या. जनतेचं दुखणं मांडण्याची संधी मला जनतेने दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा