घायवळ टोळी अमली पदार्थ रॅकेटमध्येही सक्रिय? एका फरार सदस्याच्या अटकेनंतर पर्दाफाश? तपासात मोठी माहिती उघड

0

कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीच्या कथित अमली पदार्थ रॅकेट प्रकरणाने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. कोथरुड येथील गोळीबार प्रकरणात पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला असताना, निलेश घायवळ पोलिसांना चकवा देत परदेशात पळून गेल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत घायवळ टोळीच्या एका फरार सदस्याला अटक केली आहे. या अटकेने अमली पदार्थ रॅकेटचा संशय अधिक गडद झाला आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोथरुड गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी मुसाब इलाही शेख याला अटक केली. शेख याच्याकडून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे, ज्यामुळे घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटमधील सहभागाचा संशय बळावला आहे. पोलिस सूत्रांनुसार, शेख हा घायवळ टोळीचा महत्त्वाचा सदस्य असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे, कारण निलेश घायवळला पासपोर्ट मिळवण्यासाठी पोलिसांनीच व्हेरिफिकेशन केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेशी संलग्न एका पोलिस निरीक्षकासह दोन कॉन्स्टेबल यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या घायवळला पासपोर्ट कसे मिळाले, यावरून पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाविकास आघाडीने या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे, तर भाजपने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मैदानात उतरवले आहे. शिरोळे यांनी घायवळला पासपोर्ट मिळाले तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते, याकडे लक्ष वेधत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पुणे पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, घायवळ टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. निलेश घायवळ परदेशात असला तरी त्याच्या टोळीच्या इतर सदस्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.