पुण्यात महायुतीमधील संघर्ष शिगेला, ‘एकनाथ शिंदेंनी धंगेकरांचे कान उपटूनही…’, भाजपची खोचक टीका

0

पुणे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील हा गुंड निलेश घायवळच्या संपर्कात होता, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. यावरुन रवींद्र धंगेकर आणि भाजप नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं होतं. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. पण धंगेकर शांत राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळे समीर पाटील यांनी धंगेकरांना 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. “मी मकोकामधील आरोप असल्याचं सिद्ध करा अन्यथा गुन्हा नोंदवू”, असा इशारा समीर पाटील यांनी दिला आहे. “रवींद्र धंगेकर यांनी आरोप सिद्ध केले नाहीत किंवा माफी मागितली नाही तर कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु”, असं समीर पाटील म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

समीर पाटील यांच्या इशाऱ्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी टीका केली आहे. “मी काय गैर बोललो? मकोकावाल्याने मला नोटीस द्यायची हा लोकशाहीचा किती अपमान आहे? मकोकावाला मला नोटीस देतात तर पोलीस करतात काय? गुन्हेगार ही भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य माणूस पोलीस चौकीतच जाणार नाही. मार खाऊन घरीच बसेल”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. रवींद्र धंगेकर यांच्या या टीकेनंतर आता पुणे शहर भाजपचे सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांचे कान उपटून देखील काही परिणाम झाला असं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की, सातत्याने निवडणुकीत झालेला पराभव आणि आमदार रोहित पवार यांनी पुरवलेलं पाठबळ, यामुळे त्यांचा महायुतीत मिठाला खडा टाकता येईल का, असा त्यांचा प्रयत्न आहे. कुठलेही आरोप करायचे आणि त्यावर कुठलाही पुरावा न देता बिनबुडाचे आरोप करत राहायचे. त्याची बातमी करत राहायची असा रवींद्र धंगेकर यांचा अनेक दिवसांपासूनचा प्रयत्न आहे”, अशी टीका सुशील मेंगडे यांनी केली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

“या सर्व गोष्टी लक्षात येत आहेत की, भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सातत्याने आरोप करत राहायचे, महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न रवींद्र धंगेकर यांच्याकडून सुरु आहे. माझी विनंती आहे की, रोहित पवारांचं सुरु असलेलं हे कारस्थान आहे. याबाबत आम्ही पुरावे देऊ”, असं सुशील मेंगडे म्हणाले.

“रोहित पवारांच्या आदेशावरुन रवींद्र धंगेकर काम करत आहेत, असं आमचं ठाम मत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकसंघ होऊन महाराष्ट्रात वेगवान काम करत आहेत. पण घटक पक्ष असतानादेखील राज्यातील आपल्या प्रमुख नेत्यांवर आरोप करायचे आणि महायुतीत दुरावा निर्माण करायचा याची सुपारी रोहित पवार यांनी रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. याबाबतचे पुरावे लवकरच आम्ही सादर करु”, असं सुशील मेंगडे यांनी सांगितलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार