पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून समस्त पुणेकरांकडून प्रारूप प्रभाग रचनेबाबत जाहीर आणि लेखी दोन्ही स्वरूपात प्रचंड टीका आणि आरोप प्रत्यारोप केले जातो होते. त्याचा परिणाम प्रभाग रचनेच्या प्राप्त होणाऱ्या हरकती / सूचनावर होणार हे जग जाहीर असताना पुणे महापालिकेच्या वतीने हरकती सूचना या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत दोनच दिवसांची (कामकाज वेळ फक्त १० तास) जाहीर सुनावणी आयोजित करून पुणे शहरातील सर्वसामान्य पुणेकरांच्या इच्छांवर पाणी सोडून तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने हरकती आणि सूचना घेण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिलेला असताना सुद्धा ही शेवटच्या दोन दिवसांमध्ये या हरकती सूचना घेऊन प्रशासनाला या विषयाचे किती गांभीर्य आहे याची जाणीव होत आहे.






स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी प्रशासनावरती असलेला दबाव आणि वैयक्तिक हित संबंध याचा प्रभाग रचनेच्या हरकती सूचना वरती परिणाम होऊ नये म्हणून मा. श्रीमती व्ही. राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई (महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग प्राधिकृत अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासनाच्या वतीने प्रभाग रचना हरकती सूचना ही तटस्थ व प्रक्रिया राबवली जाणार अशी वर्गणी केली जात असली तरी सुद्धा फक्त कामकाजाच्या दहा तासांमध्ये शहरात प्राप्त झालेल्या सुमारे पाच हजार सहाशे हरकती सूचना कशा निकाली निघणार ही मोठी चर्चेची गोष्ट बनली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने दि.११/०९/२०२५ ते दि.१२/०९/२०२५ रोजी महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे हरकती सूचना घेण्याची नियोजन केले असले तरीसुद्धा दोन दिवसांमध्ये या सूचनांचा कसा निपटारा केला जाईल हे पहावे लागेल.
हरकती सूचनांच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११/०९/२०२५ रोजी प्रभाग क्र. १ ते ६ मधील (प्र. क्र 1 – 23, 2 – 7, 3- 819, 4- 116, 5- 96, 6 – 60)= 321 हरकती सूचनांसाठी फक्त सकाळी १०.०० ते सकाळी ११.३० दीड तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर प्रभाग क्र. ०७ ते १४ मधील हरकती सूचनांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी ०१.०० च्या दरम्यान सुमारे (7-71, 8- 116, 9-7, 10- 3, 11-10, 12- 5, 13 – 44, 14 – 77)= 333 हरकती सूचनांवर निर्णय घ्यावा लागणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये प्रभाग क्र. १५ ते २१ मधील हरकतींसाठी दुपारी ०२.३० ते सायं. ०४.०० या दीड तासाच्या अवधीमध्ये (15- 558, 16- 99, 17- 54, 18- 59, 19- 168, 20- 47, 21- 49)= 1034 एवढ्या प्रचंड हरकती सूचनांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेवटच्या सत्रात प्रभाग क्र. २२ ते २९ मधील सायं. ०४.०० ते सायं. ०६.०० या दोन तासांच्या कालावधीत (22- 50, 23- 25, 24- 251, 25- 0, 26- 13, 27- 12, 28- 4, 29- 0)= 355 सूचना हरकती पूर्ण कराव्या लागतील अशा प्रकारे सुमारे 2043 हरकती पहिल्या दिवशी पूर्ण करून पुणे महापालिका प्रशासनामार्फत सामान्य नागरिकांना किती न्याय दिला जाईल याबाबत पुणेकर साशंक आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने हरकती सूचना देण्याच्या शेवटच्या दिवशी १२/०९/२०२५ उर्वरित प्रभाग क्रमांकच्या हरकत सूचनाचा शुभारंभ करण्यात येणार असला तरी सुद्धा या दिवशी सर्वात मोठी परीक्षा प्रशासनाचे आहे कारण प्रभाग क्रमांक 34 मधून सर्वाधिक 27 २६६ हरकती सूचना प्राप्त झाल्या असून या हरकती सूचनांचे नियोजन कसे करायचे हा एक प्रश्न असताना केवळ दीड तासांमध्ये महापालिका प्रशासनाकडून हरकती सूचना घेण्याची नियोजन केले आहे. त्यामध्ये प्रभाग क्र. ३० ते ३४ फक्त पाच प्रभागांच्या हरकती सूचनांसाठी स १०.०० ते सकाळी ११.३० राखीव वेळ ठेवण्यात आली असून (30- 0, 31- 1, 32- 11, 33- 21, 34- 2066)=2099 सूचनांवर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभाग क्र. ३५ ते ३७ मधील नागरिकांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी ०१.०० वेळ ठेवण्यात आली असून (35- 36, 36- 7, 37- 183)=226 हरकती सूचनांचा निपटारा केला जाणार आहे. दुपारच्या सत्रात सरतेशेवटी पुण्याच्या दक्षिणेकडे प्रभाग क्र. ३८ (पाच सदस्यांचा सर्वात मोठा) ते ४१ व सामाईक हरकतीसाठी दुपारी ०२.३० ते सायं. ०४.०० दरम्यान (38- 168, 39- 99, 40- 13, 41 – 37) इतर 11=228 सूचनांचा विचार केला जाणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात 2153 हरकती सूचना आल्यानंतरही फक्त दीड दिवसांच्या काळामध्येच या हरकती सूचनांचा विचार केला जाणार असल्याने पुणेकरांच्या विचारांना किती महत्त्व दिले जाईल हे सुनावणीच्या दरम्यान पाहावे लागणार आहे.
विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेच्या शेवटी राखीव वेळ म्हणून सायं. ०४.०० ते सायं. ०५.०० असा एक तासाचा अवधी ठेवण्यात आला असला तरी यादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना यामधून किती वेळ मिळणार की कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या अखेरच्या तासाचा ही वापर केला जाणार याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. विहित मुदतीत हरकत घेतलेल्या नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत सूचनापत्र पाठविलेले असून याद्वारे देखील हरकत घेतलेल्या नागरिकांना उक्त नमूद प्रभागात घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगाने नमूद तारीख व वेळेत स्वतः उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी सुनावणीसाठी पाठविलेल्या सूचनापत्रातील सूचनांचे अवलोकन करावे. असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.











