दत्तात्रय भरणेंचा कृषिमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच मोठा निर्णय; म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचेच निर्णय….

0

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. कृषिमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी पदभार स्वीकारताच कृषी विभागातील एमपीएससीमध्ये उत्तीर्ण झालेल्या १४ जणांची नियुक्ती करणाऱ्या पत्रावर सही केली. त्यामुळे १४ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज मी कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत त्यामुळे मला हे खातं मिळाले आहे. मी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतले जातील.’

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कृषीमंत्री भरणे यांनी पुढे असे देखील सांगितले की, ‘शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा विकासासाठी निर्णय घेण्यात येतील. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करेल.’

दरम्यान, पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये रमी गेम खेळतानाचा माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. रमी गेम खेळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आले आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आले. तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात आलं.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती