गुहागर दि. २८ (रामदास धो. गमरे) “लाभ–आलाभ, यश–अपयश, निंदा–स्तुती, सुख–दुःख हे जीवनात अपरिहार्य आहेत. यांना अष्टधम्म असे म्हणतात. या अष्टधम्मांवर सजगपणे स्वार होणे, त्यांना समजून घेऊन त्या अनुभवातून संयम ठेवणे, समजूतदारपणाने वागणे हेच खरे लोकधम्माचे मर्म आहे. हे मर्म लोकुत्तर म्हणजेच उध्दिष्ठ धम्माशी जोडलेले आहे.
लोकधम्म म्हणजे सांसारिक परीक्षांची साधने. जो त्यांचा अनित्य बोधाच्या आधारे सामना करतो, तोच खरा संत असून समाजाला मार्गदर्शक ठरतो. हे जीवन जगताना ध्यान, साधना, संयम आणि सजगता यांच्या साहाय्यानेच आपले मन शांत व शुद्ध होते. हेच खरे लोकधम्म आहे; हे सर्व समजावून सांगताना त्यांनी पाली भाषेतील अनेक गाथांचा मराठीत अनुवाद करून सोप्या उदाहरणांद्वारे ही संकल्पना सामान्य माणसालाही समजेल अशा पद्धतीने स्पष्ट करीत लोकधम्म संकल्पना ही प्रत्येकाच्या व्यवहारात उतरली पाहिजे यामुळेच ती केवळ तात्त्विक न राहता जीवनाला दिशा देणारी ठरते.” असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र हेमंत रोहिणी अनंत पवार (पूर्व भिक्खू अभिधम्मपाल) यांनी वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफत असताना केले.
बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प विश्वस्त दीपक जाधव आणि परिवाराच्या शुभहस्ते संघाचे अध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन Google Meet द्वारे मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर केले.
सदर कार्यक्रमास गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच दीपक मोहिते व परिवार, उपासक हेमंत रोहिणी अनंत पवार (पूर्व भिख्खू अभिधम्मपाल) शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, सर्व उपासक, उपासिका व सर्व उपस्थितांचे आभार मानून संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.