राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापले असताना, शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी पक्षाला थेट आव्हान दिले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना एक महत्त्वाचे पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री व आमदारांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
मंत्र्यांवरील गैरव्यवहारांचे आरोप
या पत्रात राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहारांबद्दल आणि विविध प्रकरणांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेषतः, मंत्री संजय शिरसाठ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्यावरील गंभीर प्रकरणांची वस्तुस्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडण्यात आली. या मंत्र्यांवर विविध प्रकारचे गैरव्यवहार आणि वादग्रस्त प्रकरणे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
इतरही अनेक गंभीर प्रकरणांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये ‘हनी ट्रॅप’ प्रकरण, ठाणे-बोरिवली बोगदा प्रकरण, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार यासारख्या मुद्द्यांवरही राज्यपालांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली. या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेऊन संबंधित मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
शिष्टमंडळातील कोण कोण?
शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, उपनेते विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, अशोक धात्रक, विजय कदम, नितीन नांदगावकर, विठ्ठलराव गायकवाड, भाऊ कोरगावकर, सुषमा अंधारे, सुप्रदा फातप्रेकर, विशाखा राऊत, सचिव साईनाथ दुर्गे, पराग डाके, आमदार मिलिंद नार्वेकर, जगन्नाथ अभ्यंकर, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, अनंत नर आणि महेश सावंत या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. ठाकरे गटाने राज्यपालांच्या भेटीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यपाल या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.