पुणे: महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण व विस्तारीकरण ‘एकात्म स्मारक’ स्वरूपात करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने महापालिकेकडे १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकेने भूसंपादन गतीने करावे, असे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले. भुजबळ यांनी भिडेवाडा आणि फुलेवाडा परिसरात भेट देत स्मारक विस्ताराच्या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला आणि भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
भुजबळ म्हणाले, “स्मारकालगतच्या आरक्षित जागेचे पुणे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कामात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिलेल्या सूचनांचाही विचार व्हावा.” महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, सहायक आयुक्त किसन दगडखैर, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, अधीक्षक अभियंता राजेश बनकर आदी अधिकारी उपस्थित होते.