महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की चर्चा होते ते कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘खळपटा’ची अन कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘चोपा’ची सर्वत्र चर्चा होते परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघ आणि जनसेवक कैलासभाऊ दांगट मित्र परिवार यांच्या वतीने ‘मराठी प्रशिक्षण वर्ग’ मनसेचा हा नवा पॅटर्न! सुरू करण्यात आला आहे. खरंच महाराष्ट्रात शिक्षण उद्योग व्यवसाय निमित्त आलेल्या पर राज्यातील नागरिकांसाठी या उपक्रमाचा फायदाच होणार आहे. रस्त्यावर आणि चौकाचौकात दरपकड आणि मारामारी करणाऱ्या मनसैनिकांसाठी हा एक अभिनव उपक्रम असून सर्वत्र याची चांगलीच चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात रोजी रोटी साठी आलेल्या परप्रांतीयांची गरज लक्षात घेऊन ‘पहिला वर्ग’ वारजे-माळवाडी परिसरात उत्साहात पार पडला.
मराठी भाषा जपण्यासाठी आणि परिसरातील अमराठी नागरिकांना योग्य उच्चार, लेखन व संवाद कौशल्य आत्मसात करता यावं, या उद्देशाने ह्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या वर्गाला वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, उपस्थित सर्वांनी आपली स्वेच्छा व्यक्त करत हा अभ्यासक्रम नियमितरित्या पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वर्गात प्रसिद्ध साहित्यिक प्रा. वी. दा. पिंगळे सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषेचे महत्व, तिची संस्कृतीशी नाळ आणि शुद्ध भाषेचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मनसेच्या माजी नगरसेविका सौ. भाग्यश्रीताई दांगट, मनसे पुणे शहर उपाध्यक्ष कैलासभाऊ दांगट, तसेच मनसे पदाधिकारी नितीन वांजळे, अनिकेत गुंजाळ, विशाल पठारे आणि परिसरातील विविध मराठीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन खडकवासला उपविभाग अध्यक्ष गौरव दांगट, शाखा अध्यक्ष रियाज शेख, आणि शाखा अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केले. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये मराठीप्रती प्रेम जागवण्यासाठी व नव्या पिढीत भाषेची गोडी निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. आगामी काळात अशा अनेक वर्गांचे आयोजन करून संपूर्ण पुणे शहरात मराठी प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष कैलासभाऊ दांगट यांनी सांगितले.