हनी ट्रॅप प्रकरणामुळे भाजप नेते प्रफुल्ल लोढा हे चर्चेत आहेत. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यात लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात नोकरीचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. लोढा यांच्यावर आधीच दोन मुलींवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. राजकारणात सक्रीय असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप ३६ वर्षीय महिलेनं केलाय. लोढा यांनी महिलेला बालेवाडीत एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावून घेतलं आणि बलात्कार केला असा आरोप आहे.
पीडितेनं विरोध करताच महिलेची नोकरी घालवण्याची धमकी प्रफुल्ल लोढा यांनी दिली. त्यानंतर बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
महिलेनं तक्रारीत म्हटलं की, प्रफुल्ल लोढा यांनी नवऱ्याला नोकरी लावून देतो असं सांगितलं. त्या बहाण्यानं २७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं. तिथं प्रफुल्ल लोढा यांनी तुझ्या नवऱ्याला नोकरी लावायची असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव असं म्हटलं. मी यासाठी नकार दिला. मी विरोध करताच लोढा यांनी तुझीही नोकरी घालवेन असं म्हणत धमकी दिली आणि माझ्या इच्छेविरुद्ध बळजबरी शरीरसंबंध ठेवले.
महिलेनं प्रफुल्ल लोढा यांच्याविरोधात तक्रार दिल्यानं आता लोढा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याआधीही त्यांच्यावर दोन मुलींवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यातच नव्या गुन्ह्यामुळे प्रफुल्ल लोढा यांचा पाय आणखी खोलात गेलाय.