मुंबई दि. १४ (रामदास धो. गमरे) “मनुष्याला संकट, व्याधी, भय, दुःख यांसारख्या मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून संरक्षण देणारा आणि त्याच्या जीवनात शांती, स्थैर्य व प्रज्ञेचा प्रकाश पसरवणारा पाठ म्हणजेच परित्राण पाठ होय. परित्राण पाठ पठण करताना आपण उंच जागी एक तांब्या ठेवतो त्याला पवित्र दोरा बांधतो आणि तो दोरा सर्व श्रद्धाळूंना हातात दिला जातो — यामागील गूढार्थ फारच सुंदर आहे; हा दोरा म्हणजेच समत्व आणि शुद्धतेचं प्रतीक आहे आपण सर्व निर्मळ, निष्कलंक आणि समान आहोत ही भावना त्या क्षणी घट्ट होते नंतर या दोऱ्याचे दोन्ही टोक एकत्र करून पाण्यात ठेवले जाते याचा गूढार्थ म्हणजे जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे अटळ नियम आहेत आणि त्याच्या दरम्यानचा हा जीवनप्रवास धम्माच्या प्रकाशातच योग्य अर्थाने पार करायचा आहे, या परित्राण पठणाच्या माध्यमातून धम्मदान, श्रद्धा आणि सद्भावना या मूल्यांचा प्रसार होतो. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा ही केवळ संकट टाळणारी नसते तर अंतर्मनात एक प्रकारची शुद्धता, प्रज्ञा आणि करुणा जागृत करणारी असते म्हणून परित्राण पाठ हे केवळ संकटांपासून रक्षण करणारे पाठ नसून ते जीवन जगण्याची एक पवित्र कला आहे; शांतीच्या वाटेवर नेणारे आणि धम्माच्या मार्गावर टिकवून ठेवणारे एक सशक्त साधन आहे.” असे प्रतिपादन सुगंध कदम यांनी वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रथम पुष्प गुंफताना केले.
बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी गाव व मुंबई शाखा संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे, सदर प्रवचन मालिकेचे प्रारंभ तथा प्रथम पुष्प अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी बीडीडी चाळ ३ व ४ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, नायगाव, मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर प्रसंगी संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे सचिव सचिन मोहिते यांनी आपल्या धीरगंभीर, पहाडी व प्रभावी आवाजात लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन केले. तसेच अध्यक्ष संदीप गमरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तद्नंतर कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन, ध्येय, उद्दिष्टे आणि उद्देश स्पष्ट करीत प्रस्ताविक सादर केले त्यावेळी संघाच्या पुढील वाटचाली संदर्भात सुचोवात करीत उपस्थितांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, विश्वस्त दीपक जाधव, विश्वस्त पांडुरंग गमरे, माजी मुख्य विश्वस्त संजय पवार, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, सरचिटणीस संदेश गमरे, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, सचिव संदेश जाधव, सुभाष मोहिते आदी मान्यवरांनी शुभेच्छापर विचार मांडले. विभाग अध्यक्ष संतोष पवार, किशोर जाधव, सचिन गमरे, संतोष कदम, संजीवनी यादव, धम्मवर्तन तांबे, संजय पवार, सर्व समितींचे प्रमुख, शाखांचे कार्यकर्ते सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सुरेश पवार यांनी कोरोना काळापासून तालुका संघाच्या सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या संदर्भातील आढावा मांडत यापुढे ही सर्वांनी एकमताने, एकदिलाने असे उपक्रम राबविले पाहिजे, मुंबईत सुरू झालेली नांदी गावी घराघरात पोहोचली पाहिजे असे मत नोंदवले. माजी विश्वस्त संजय पवार, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, ऑडीटर शैलेंद्र पवार, सरचिटणीस संदेश गमरे यांनी गेल्या ७५ वर्षात शक्य न झालेली बाब म्हणजे आर्थिक बाजू मजबूत करणे तीही आता पतसंस्थेच्या माध्यमातून आता मूर्तरुपात साकार झाली असून पतसंस्थेच्या रूपात लावलेल्या लहान रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी गाव व मुंबईच्या सर्व शाखा, पदाधिकारी, सभासद यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी बौद्धजन सहकारी संघ पवारसाक्री शाखा क्र. २० च्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करून सरचिटणीस संदेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.