मुंबई : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आज विधानसभेच्या सभागृहात मोठा गोंधळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले हे आज सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिशेला धावून गेले. त्यांनी राजदंडाला हात लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. भाजप नेते बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी आज शेतकऱ्यांची माफ मागावी, अशी मागणी केली. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. यावेळी सभागृहातील गदारोळ इतका वाढला की नाना पटोले थेट अध्यक्षांच्या दिशेला गेले. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी नाना पटोले यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. तसेच या प्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी निलंबित केलं.
विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईवरुन विरोधकांनी सभात्याग केला. या घटनेनंतर नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे, असं म्हटलं. तसेच नाना पटोलेंनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला. कारण दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीत आता त्यांचं नाव कुठेच दिसत नाही, असा टोला एकनात शिंदे यांनी लगावला.
एकनाथ शिंदे काय म्हणाले
“नाना पटोले हे स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना विधानसभेचं कामकाज माहिती आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे हे त्यांनाही माहिती आहे. पण ते आज का इतके आक्रमक झाले ते कळलं नाही. ते थेट अध्यक्षांच्या दिशेला गेले आणि त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. त्यांनी दिल्लीत देखील काही दिवसांपासून चर्चा दिसत नव्हती. नावाची चर्चा झाली पाहिजे, पुन्हा चर्चेत आणि प्रकाशझोतात यायला पाहिजे म्हणून त्यांचे हे प्रयत्न आहेत का? म्हणून पुन्हा मोदींचच नाव घेतलं पाहिजे. कारण बाप बापच असतो. विधानसभेत जनताने दिले झटके आणि काँग्रेस 16 वर अटकले, त्यांनी त्यातून बोध घेतला पाहिजे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.