एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना तर फुटलीच त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारही कोसळलं. तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही ठाकरेंच्या हातून निसटलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सातत्यानं धक्क्यावर धक्के दिले. पण आता याच शिंदेंना आता त्यांच्या शिवसेनेत बंडाची भीती वाटू लागली की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण त्यांनी काही सावध पण मोठी पावले उचलली आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांपूर्वी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव मांडले गेले. तसेच यातील एका ठरावाची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संस्थेच्या अंतर्गत शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा येणार आहे. त्यांचं व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिलं जाणार आहे.
शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेकडूनच पक्षनिधी, गरजवंताना मदत, पक्षाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रम ठरवण्यात येतील. याच संस्थेकडून शिवसेनेशी संबंधित समाजपयोगी, लोकोपयोगी कामांचंही नियोजन करण्यात येणार आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाचा सगळ्यात मोठं नुकसान उद्धव ठाकरेंना सहन करावं लागलं होतं. ज्यावेळी बहुतांश उद्धव ठाकरेंची साथ सोडत खासदार, आमदार,नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या नेतेमंडळींकडून शिवसेनेच्या विविध मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखांवर दावे ठोकण्यात आले होते. हा ठाकरेंना अडचणीत आणणारा धक्का होता.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंना शिवसेनेतील बंडावेळी ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या अनेक बाबींची माहिती आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा ठाकरेंच्या हातून कशा निसटल्या,याचीही जाणीव शिंदेंना आहे. त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जपून पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भविष्यातील शिवसेना पक्षातील बंडाचा धोका टाळण्यासाठीच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्था स्थापनेचा ठराव सादर करण्यात आला आहे.