वी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. विजयानंतर जल्लोषाला सीमा उरली नव्हती. प्रत्येक खेळाडू आनंदाने उड्या मारत होता. भारतामध्ये तर दिवाळीच सुरू होती. आपल्या या हिरोंची मायदेशी परतण्याची भारतीय आतुरतेने वाट पाहात आहे. जेणेकरून त्यांच्यासोबत हा आनंद साजरा करता येईल, पण यासंदर्भात एक महत्त्वाची अपटेड समोर येत आहे.






मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ बार्बोडोसमध्ये अडकला आहे. बार्बाडोसमध्ये बेरील चक्रीवादळ आलं आहे. त्यामुळे त्यांना परत भारतात येण्यास अडचणी येत आहेत. जेव्हा बेरील चक्रीवादळ शांत होईल किंवा तो आपला मार्ग बदलेल तेव्हा भारतीय संघाचा मायदेशी येण्याचा मार्ग मोकळा होईल. भारतीय क्रिकेट संघ कधी भारतात येईल याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
रिपोर्टनुसार, बेरील चक्रीवादळाचा उगम अटलांटिक महासागरात झाला आहे. चक्रीवादळाची गती २१० किलोमीटर प्रति तास इतकी प्रचंड आहे. सध्या हे चक्रीवादळ बार्बाडोसच्या पूर्व-दक्षिण दिशेला जवळपास ५०० किलोमीटर अंतरावर आहे. या कारणामुळे ब्रिजटाऊनमधील विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळेच भारतीय संघाच्या तात्काळ मायदेशी येण्याच्या प्लॅनवर पाणी फिरलं आहे.
टीम इंडियासह एकूण ७० जण बार्बाडोसमध्ये अडकले आहेत. यामध्ये सपोर्ट स्टाफ, फॅमिली आणि अधिकारी यांचा समावेश आहे. टीम इंडिया ब्रिजटाऊन येथून न्यूयॉर्कला येणार होती. त्यानंतर दुबईला थांबा घेऊन भारतात येणार होती. भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी टीमची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दुसऱ्यांदा टी-२० ट्रॉफी जिंकल्याने देशभरातून टीमवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत टीम इंडियाने शेवटच्या क्षणी सामना खेचून आणला असं म्हणता येईल. गोलंदाजांनी केलेली उत्तर कामगिरी यामुळे भारताचा विजय सुकर झाला. शिवाय विराट कोहलीने अंतिम सामन्यात निर्णायक खेळी केली.











