हडपसरमधील डीपी रोड (यश हॉस्पिटलजवळ, माळवाडी) परिसरात कचऱ्याचे ढीग आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि आजारांचा धोका वाढत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पुणे महापालिकेकडून (PMC) कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची तक्रार आहे.






संदीप नायर, स्थानिक रहिवासी म्हणाले, “यश हॉस्पिटलजवळ डीपी रोडवरील कचरा आणि साचलेल्या पाण्यामुळे हा परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दुर्गंधी, डासांची पैदास आणि रोगराईचा धोका वाढत आहे. PMCला वारंवार कळवूनही काहीच उपयोग झालेला नाही.”
कविता राणे, आणखी एक स्थानिक रहिवासी म्हणाल्या, “ग्रीनवूड्स स्कूल आणि युरो स्कूलच्या विद्यार्थ्यांना याच रस्त्याने जावे लागते. लहान मुलांचे आरोग्य लवकर बिघडते. मी PMC च्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार केली, तक्रारीचा क्रमांकही मिळाला, पण परिस्थिती तशीच आहे.”
संजना वर्मा, स्थानिक रहिवासी म्हणाल्या, “येथे १५ पेक्षा जास्त हाउसिंग सोसायट्या आहेत. वृद्ध नागरिक येथे चालायला येतात, पण आता साचलेल्या पाण्यामुळे त्यांना चालताही येत नाही. आम्ही लाखो रुपये गुंतवून घर घेतले, पण आता असा त्रास सहन करावा लागतो. PMC काहीच करत नसेल, तर मग नागरिक कुठे जाणार?”
या विषयावर PMC अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.











