शास्त्रीनगर उड्डाणपूलाचे काम आठ महिने उलटूनही सुरू नाही; वाहतूक विभागाच्या परवानगीअभावी खोळंबा

0
1

पुणे – शास्त्रीनगर चौकात प्रस्तावित “Y-आकाराच्या” उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाला आठ महिने उलटूनही कामाला सुरुवात झाली नाही. कारण, अद्याप वाहतूक वळविण्याच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळालेली नाही. कामाचे आदेश ऑक्टोबर २०२४ मध्ये दिले गेले असतानाही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.

प्राथमिक टप्प्यातील माती चाचणी व वाहतूक सर्वेक्षणाचे काम ऑगस्ट २०२४ मध्येच सुरू झाले होते. मात्र पाळखी मिरवणुका व वाहतुकीचा ताण लक्षात घेता सध्या काम सुरू करणे शक्य नसल्याचे पुणे महापालिकेचे वरिष्ठ अभियंते सांगतात.

“वाहतूक विभागाने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (NoC) दिलेले नाही. तसेच पावसाळ्यामुळेही काम सुरू करता आलेले नाही. मात्र, आम्ही लवकरच वाहतूक वळविण्याचा आराखडा तयार करत आहोत,” असे वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

या प्रकल्पाची रूपरेषा चार वर्षांपूर्वी तयार झाली होती. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत बदल झाल्याने पुन्हा डिझाइन करावे लागले. आधी बीआरटीएस मार्गामुळे रस्ते रुंदीकरण गरजेचे होते, पण अहमदनगर रोडवरील बीआरटी रद्द झाल्याने PMC ला ७ मीटर अतिरिक्त जागा मिळाली आणि रुंदीकरणाची गरज उरली नाही.

“ऑक्टोबरमध्ये कामाचे आदेश मिळाले, पण वाहतूक विभागाकडून वेळेवर परवानगी न मिळाल्याने अडथळा आला. आता या महिनाअखेर काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे कार्यकारी अभियंता श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले.

प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणजे ग्रेड सेपरेटरचे काम असून, वाहतूक शास्त्रीनगरहून गोल्फ कोर्स रोडकडे कार्ने रोडमार्गे वळवण्यात येणार आहे. रोड साइड अतिक्रमणे काढून रस्तेही रुंद करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

या प्रकल्पासाठी आगा खान पॅलेस जवळ असल्यामुळे पुरातत्त्व खात्याचीही मंजुरी आवश्यक होती. एप्रिल २०२४ मध्ये राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र व राज्य पुरातत्त्व खात्यांनी मान्यता दिली आहे.