रिंगरोडच्या कंत्राटाचे आमिष दाखवून १३ लाखांची फसवणूक

0
1

प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पात कंत्राट मिळवून देतो, असे सांगून एका ठेकेदाराची तब्बल ₹१३ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणेरमधील ‘हॅपी दा ढाबा’ परिसरात घडलेल्या प्रकारानंतर बावधन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२५ ते ११ मे २०२५ या कालावधीत ही घटना घडली. पठाण खान असे आरोपीचे नाव असून त्याने स्वतःचे राजकारण्यांसोबतचे फोटो दाखवत आपली ओळख मोठी असल्याचा बनाव केला. त्यानंतर ठेकेदाराचा विश्वास संपादन करून रिंगरोडच्या कंत्राटाचे आमिष दाखवले व ₹१३ लाख उकळले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेकेदाराने गुरुवारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.