नारायण राणेंची मोठी कबुली “होय बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”

0
2

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष करून मुंबईत पालिका निवडणुकीपूर्वी या सोहळ्यांना महत्त्व आहे. यातच भाजपा नेते नारायण राणे यांनी एक कबुली दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, मी मान्य करतो बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो. मला हे दिवस दिसले. त्यामुळे बाळासाहेब हेच माझे गुरू आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना कायदेशीर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे त्यांची (उद्धव ठाकरे) शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद. बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधी पदासाठी आणि पैशांसाठी तडजोड केली नाही. यांनी पदासाठी तडजोड केली. यांनी बाळासाहेबांची विचारधारा यांनी सांभाळली नाही, आजही सांभाळत नाहीत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

यांचा कसला वर्धापन दिन? एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे यांचा कसला वर्धापन दिन? उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो, वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काही केले नाही आणि आता तर त्यांचे दुकान बंद झाले आहे. ते धडपडत आहेत. बाळासाहेबांची खरी विचारधारा त्यांनी टिकवलेली नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्राचे कोणतेही भवितव्य घडणार नाही. कोणत आहेत ते? आमदार किती, खासदार किती? देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणात त्यांचा काही रोल नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी निशाणा साधला.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

दरम्यान, त्यांचे लक्ष आता फक्त मुंबई महापालिकेवर आहे. २६ वर्षे दुकान मांडले. जेवढा भ्रष्टाचार करायचा तेवढा केला. आता परत शक्य नाही. महानगरपालिका जिंकणे पूर्वीच्या शिवसेनेला (आताचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शक्य नाही. आता आम्ही आहोत इकडे. आम्ही कसे देऊ? असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.