पालखी मार्गावर मद्यविक्री व मांसविक्रीला बंदी; पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांची माहिती

0

आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांवर वारी काळात मद्यविक्री व मांसविक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली.

संदीप गिल म्हणाले, वारीच्या मार्गक्रमणादरम्यान कोणत्याही प्रकारची अपवित्रता होऊ नये आणि वारीची पारंपरिक भक्तीभावना कायम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस व संबंधित विभागांना या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असून, नियम भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

देहू व आळंदी येथून निघालेल्या संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाने विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहनांची व नागरिकांची सुरक्षितता, माहितीचा गोपनीय वापर, तसेच वारीदरम्यान होणाऱ्या गर्दीचा नियोजनबद्ध कारभार करण्यासाठी पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

१. ट्रॅफिक डायव्हर्जन (वाहतूक वळवण):

पालखी मार्गांवर जड व अनावश्यक वाहनांची ये-जा थांबवण्यासाठी एकूण १२ ठिकाणी विशेष पोलिस अधिकारी व वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. हे उपाय वारीकर, नागरिक व इतर वाहनचालकांना अडथळा होऊ नये म्हणून करण्यात आले असून, सुगम वाहतूक सुनिश्चित केली जाणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

२. मद्यविक्री व मासविक्रीवर नियंत्रण:

पालखी मार्गावरील हॉटेल्स व ढाब्यांवर मद्यविक्री व मासविक्री होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने विशेष निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात दक्षतेसाठी कारवाई केली जाणार आहे.

३. गुप्त माहिती काढण्यासाठी विशेष पथके:

सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १५ अंमलदारांच्या ३० संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक पोलीस स्टेशन आणि जिल्हा विशेष शाखांच्या समन्वयाने कार्यरत राहणार आहे.

४. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त:

वारीच्या मुक्कामस्थळी चोरी, गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिपत्याखाली विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

वरील सर्व उपाययोजना संतांची परंपरा, वारीचा भक्तिभाव व यात्रेची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी करण्यात आले असून, प्रशासन नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत आहे.