पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी सुरूच असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरात पाणी साचल्याचे आढळून आले आहे. काही भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे. अनावश्यक प्रवास व नदीकाठी फिरणे टाळावे. कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.