“चांगल्या शिक्षकांचे काम अत्यंत कठीण असते. जे उत्तम शिकवतात, तेच विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लाल शाईचे शेरे देण्याऐवजी गोष्टीची पुस्तके द्यावीत. कारण कल्पनाशक्तीला चालना देणारे साहित्य मुलांना विचारशील बनवते,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विज्ञानप्रेमी पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी केले.
गुप्ता यांच्या हस्ते ‘वाचन दिशा आणि दृष्टिकोन’ या डॉ. नवनाथ तुपे लिखित आणि युनिक फाउंडेशन प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूशास्त्र विभागाच्या सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी बोलताना अरविंद गुप्ता बोलत होते. या वेळी शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख, लोकसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे, आत्मवल्लभ शिक्षण संस्थेचे श्री कुमार रमेश पारवाल, प्रा. सतीश परदेशी (अध्यक्ष – प्राध्यापक संघटना, एसपीपीयू), युनिक फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक घोटाळे, प्रा. संजय ढोले, प्रा. राजेश गच्चे, प्रा. विकास मठे, प्रा. तेज निवळीकर, प्रा. एस. आय. पाटील, प्रा. विलास आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठातील विद्यार्थी, विविध शाळांचे शिक्षक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. केदार यांनी केले आणि डॉ. नवनाथ तुपे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या पुस्तकावर भाष्य करताना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, “विद्यार्थी गरिबीमुळे नव्हे, तर शाळेची गोडी न वाटल्यामुळे शाळा सोडतात. शाळेची गोडी न लागल्यामुळे त्यांना लिहिता-वाचता येत नाही आणि शेवटी ते शिक्षणातून गळून पडतात. अशा परिस्थितीत ‘वाचन दिशा आणि दृष्टिकोन’ हे पुस्तक एक ठोस मार्गदर्शन देणारे ठरते. या पुस्तकात लेखक म्हणतो की, मुलांनी वाचताना आशयावर प्रश्न विचारायला शिकले पाहिजे – म्हणजेच, जे शिकतो त्यावर प्रश्न निर्माण होणे आवश्यक आहे.”
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे म्हणाले, “या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. त्यातील काहींची उत्तरे या पुस्तकात दिली आहेत आणि काही प्रश्नांवर संशोधन होणे गरजेचे आहे. वाचनाच्या सुरुवातीला मुलांसाठीची पुस्तके ही चित्रमय आणि अद्भुतरसयुक्त असावीत. मानसशास्त्राने सिद्ध केले आहे की अद्भुतरसाच्या अभावामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत नाही. अशा व्यक्ती सामान्य, शुष्क बुद्धीच्या बनतात आणि कला, साहित्य, वाचन या बाबींविषयी तुच्छता बाळगतात.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला युनिक फाउंडेशनच्या मुक्ता कुलकर्णी यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली. लेखक प्रा. नवनाथ तुपे यांनी या पुस्तक निर्मितीमागील प्रेरणा आणि अनुभव कथन केला.