ऑपरेशन सिंदूरनंतर देशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे काही एजंट सापडले. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. तिच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वेगवेगळ्या राज्यांमधून अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यात आणखी एकाने भर पडली आहे. आता राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारताशी विश्वासघात केल्याचा आरोप आहे. कासिम नावाचा हा व्यक्ती पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करत होता. राजस्थानातील डीग जिल्ह्यातील गंगोरा गावचा तो रहिवासी आहे. याआधी तो दिल्लीतही राहिला आहे.
पोलिसांच्या तपासात कासिमची मावशी पाकिस्तानात राहत असल्याचे समोर आले. त्याने गेल्या वर्षी आणि या वर्षी एकूण दोनदा पाकिस्तानला भेट दिली आहे. त्याचे काही भारतीय मोबाईल नंबर पाकिस्तानी गुप्तचर एजंटशी संपर्क साधण्यासाठी वापरले जात होते. या नंबर्सद्वारे भारतात हेरगिरी केली जात आहे. तो संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता. तसेच तो भारताचे सिमकार्ड पाकिस्तानला पाठवत होता. त्यानंतर त्या सीमकार्डद्वारे पाकिस्तानी एजंट व्हॉट्सअॅपद्वारे भारतीयांशी संपर्क साधून लष्कर आणि सरकारी कार्यालयांशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवत होते.
90 दिवस पाकिस्तानात मुक्काम
कासिमसंदर्भात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तो ऑगस्ट 2024 आणि त्यानंतर मार्च 2025 मध्ये पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी तो पाकिस्तानात एकूण 90 दिवस थांबला होता. त्या ठिकाणी आयएसआयच्या एजंटची त्याने त्या काळात भेट घेतली होती. कासिम हेरगिरी करत असल्याचे उघड झाल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या तीन फोनमधून 12 टीबी डेटा काढण्यात यश आले आहे. त्यात चॅट रिकॉर्ड, कॉल लॉग, व्हिडियो फुटेट आणि आर्थिक व्यवहाराची माहिती आहे. फोनमधून मिळालेल्या डेटाची तपासणी करण्याचे कामही सुरु आहे. तिच्या संपर्कात चार आयएसआय एजंट होते. पाकिस्तानात फिरण्यासाठी तिला विशेष सुविधा दिला जात होती.