अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्यातील वादाला आता आणखी धार चढताना दिसत आहे. अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावरून दोन्ही गाटात उफाळून आलेल्या वाद आणि त्यानंतर झालेल्या हाई वोल्टेज ड्रामानंतर आता दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगताना दिसत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर खळबळजनक आरोप करत थेट खुले आव्हान दिले आहे.
नवनीत राणा यांना पाडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पैसे पुरवल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. बच्चू कडू आणि माझी संपत्ती आज लक्षात घेतली तर त्यात मोठी तफावत आढळून येईल. खऱ्या अर्थानं बच्चू कडू यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, जर माझी संपत्ती जास्त असेल तर मी त्यांना देईल आणि बच्चू कडू यांची जास्त असली तर त्यांनी ती जनतेत वाटावी, असं मी त्यांना आवाहन देत असल्याचे सांगत बच्चू कडू यांना रवी राणांनी खुले आव्हानच दिले आहे.
दंगलीवेळी एकाही हिंदूंच्या घरी भेट दिली नाही- रवी राणा
आमदार रवी राणा म्हणाले की, ‘बच्चू कडू हे मंत्री असताना अमरावतीत मोठी हिंसक दंगल झाली तेव्हा त्यांनी एकाही हिंदूंच्या घरी भेट दिली नाही. उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा देखील त्यांनी भेट दिली नाही. उलट उमेश कोल्हे हत्याकांड हे रॉबरी मध्ये कन्व्हर्ट केल्या गेलं होतं. मात्र, आम्ही त्यात हस्तक्षेप करत त्या प्रकरणी अमित शाह यांना भेटून एनआयए (NIA) चौकशी लावून या प्रकरणातील आरोपींना अटक केली.’
बच्चू कडूंना मातोश्रीवरुन सुपारी – आमदार रवी राणा
अमरावती लोकसभा मतदारसंघातील कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामध्ये आता अधिक भर पडली असून बच्चू कडूंना उद्धव ठाकरेंचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन पैसे पूरवत सुपारी घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. परिणामी, आज माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही मात्र, बच्चू कडूंवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे. आज बच्चू कडू यांची संपत्ती माझ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. जर ही संपत्ती माझ्या संपत्तीपेक्षा कमी निघाली तर मी राजकारण सोडेल, असे खुले आव्हान देखील रावी राणा यांनी दिले आहे.