वैष्णवी चॅटिंग आम्हीही व्हायरल केले असते पण…; त्या अँगलने तपासच नाही, त्या व्यक्तीचा 19 मे रोजी साखरपुडा हगवणेंच्या वकिलाचा खळबळजनक दावा

0

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात आज न्यायालयात जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. आरोपी हगवणे कुटुंबातील पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता, पुणे न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे. मात्र, न्यायालयात आरोपींच्या वकिलाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप होत आहे. त्यावर, आता हगवणेंचे वकील विपुल दुषिंग यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी, आम्ही वैष्णवीचं  कुठलंही चारित्र्यहनन केलेलं नाही. केवळ सत्य बाजू न्यायालयासमोर मांडण्यात आली, असे दुषिंग यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी वकिलांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यामध्ये, वैष्णवीचे ज्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होते त्या व्यक्तीचा 19 मे रोजी साखरपुडा झाला असून न्यायालयात आम्ही ही माहिती दिल्याचेही त्यांनी म्हटले.

आरोपीचे वकील म्हणाले की, वैष्णवीचा नवरा, तिचा सासरा आणि कुटुंबातील काही लोकांकडून जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार, वैष्णवीच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर होता. तिच्या नवऱ्याला तो मजकूर सापडला होता, त्यानंतर तिच्या घरच्यांना याबाबत माहिती देखील दिली होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांनी वैष्णवीचा मोबाइलही काढून घेतला होता. आता, मोबाईलमधील त्या चॅटिंगचा तिच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का? हे पोलिसांनी तपासावं अशी विनंती, मागणी आम्ही 16 मेपासून पोलिसांना वारंवार केलेली आहे. परंतु, पोलिसानी आजपर्यंत त्या अँगलने कुठलाही तपास केलेला नाही, हाच युक्तिवाद आम्ही केल्याचे वकील यांनी म्हटलं आहे.

आम्हीही ते चॅट व्हिडिओ व्हायरल केले असते

ती आमच्या कुटुंबीयांची सून होती, आमच्या एका मुलाची आई होती. त्यामुळे, केवळ कस्पटे कुटुंबाचंच नुकसान झालं नसून आमचंही नुकसान झालंय असे हगवणे कुटुंबीय म्हणत आहेत. तसेच, आम्हाला संसार टिकवणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे मोबाईलमधील चॅटिंगनंतर आम्ही ना नोटीस पाठवली ना घटस्फोटाचा अर्ज केला. आम्हीही ते व्हॉट्अप चॅट व्हायरल केले असते, पण आम्ही तिच्या माहेरी कळवलं होतं. अद्याप पोलिसांना हा मुद्दा घेऊन तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून न्यायालयात ही मागणी केली आहे.

19 मे रोजी त्याचा साखरपुडा झाला

19 मे रोजी चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीचा साखरपुडा होता, तो झालाय. वैष्णवीच्या आत्महत्येची घटना घडल्यानंतरही तो साखरपुडा थांबला नाही. त्यामुळे, या घटनेसाठी हे कारण असू शकतं, ते का शोधत नाहीत. म्हणूनच, आम्ही त्या व्यक्तीचं नाव, डिटेल्स, साखरपुड्याची तारीख आणि चॅटिंगही न्यायालयात दिलं आहे, असे वकिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, वैष्णवीने दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे एफआयआरमध्ये आहे. वैष्णवी आणि तिचा नवरा या दोघांमध्ये फक्त आणि फक्त मोबाईल या कारणामुळेच भांडणं झाले आहेत. तिच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह गोष्टीमुळेच ही भांडणं झाली आहेत.