पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची पुण्यात महत्वाची बैठक शांताई हॉटेलमध्ये पार पडली. मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यात पार पडणाऱ्या प्रथा-परंपरा यावर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये लग्नसोहळ्याच्या संबंधाने सामाजिक आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.
‘लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी, यावर बैठकीत चर्चा झाली. समाज म्हणून आपल्याला या एकत्र यावे लागेल, मुहूर्तावर लग्न लागत नाहीत.. ते वेळेवर लागेल याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे, समाजाची बदनामी होते आहे, जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट केले जात असून विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय.’ या मुद्द्यांवर बैठकीत चार्चा झाली.
”मराठा समाजाला टार्गेट केलं जातंय”
हगवणे कुटुंबियांनी केलेलं कृत्याला मराठा समाज समर्थन करणार नाही. ही जी घटना झाली तशी एका समाजातच होत नाही, सर्व समाजात ही वृत्ती आहे. तरीही मराठा समाजाला टार्गेट करण्याचे काम चालू आहे, असा सूर बैठकीमध्ये होता.
मराठा समाजात लग्नाचे प्रदर्शन होते आहे, मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जात आहे. राजकीय मराठा लोकांनी पक्षाची वहाने बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे.. समाज ही एक संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे, अशा भावना बैठकीतून उमटल्या.
मराठा समाजाची आचारसंहिता
मराठा समाजात अंतर्गत आचारसंहिता लागू करण्याची वेळ आली असून नियम बनवताना सुनांनी कसं वागायचं? नंदाने कस वागायचं? हे शिकवण्याची गरज आहे.
मुलीला जास्तीत जास्त शिकवून स्वतःच्या पायावर उभं करा
दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपण पण केले पाहिजे, हा हट्ट नको, प्री-वेडिंग शूट म्हणजे अतिशय घाणेरडे प्रवृत्ती आहे.
मराठा समाजातील एका वर्गाला समज नसून माज आला आहे, हे आज मान्य करायला हवं.
लग्न, टिळे याचं राजकीयकरण झालं आहे. पुणे शहरातील काही गावांमध्ये मांडव टाकायला आठ-वीस लाख दिले जातात.
पुण्यात वीस लाखाच्या आत लग्नच होत नाही. भाषणबाजी बंद करा, लग्न कमी वेळेत आणि कमी लोकात करा, कमी खर्चात करा.. साखरपुडा-हळद एकत्रीत केलं जावे.