मान्सून केरळमार्गे महाराष्ट्रात! दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र; पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?

0
4

पुणे : केरळ, कर्नाटकमध्ये दाखल झाल्यापासून दुसऱ्याच दिवशी मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापत रविवारी तळकोकणात प्रवेश केला. दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मराठवाड्याकडे सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान अनुकूल असल्याने पुढील तीन दिवसांत मान्सून मुंबईसह राज्याचा आणखी काही भाग व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस आधी केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने तब्बल तेरा दिवस आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला. सर्वसाधारण तारीख ७ जून असते. कर्नाटक किनारपट्टीच्या उत्तर भागातील कारवार येथे शनिवारी पोचलेल्या मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा ओलांडत तळ कोकणातील देवगडपर्यंत मजल मारली.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

मान्सून प्रगतीची उत्तर सीमा रविवारी देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, ऐझॉल, कोहिमा येथून जात असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी मोसमी वाऱ्याचा प्रवाह तीव्र असल्याने पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मान्सून वेगाने प्रगती करीत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवस कायम राहणार असून, या काळात महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये मान्सूनच्या प्रगतीची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी रत्नागिरीजवळ किनारपट्टी ओलांडलेल्या ‘डिप्रेशन’ची तीव्रता रविवारी पूर्वेकडे सरकताना कमी झाली. रविवारी ठळक कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावर स्थिरावले. या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी सर्वदूर संततधार पावसासह मुसळधार सरींनी हजेरी लावली. कोकणात पावसामुळे बागायतदारांचे नुकसान झाले असून, पर्यटनाला फटका बसला आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

२७ मे नंतर पाऊस ओसरणार?

‘आयएमडी’ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २७ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्यापुढील दोन दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्राच्या प्रभावामुळे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा जोर वाढून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकेल. पुण्यात २७मेनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.

बारामती दौंडमध्ये जोरदार पाऊस

बारामतीमध्ये शनिवारी रात्री, तर दौंडमध्ये रविवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला, बारामतीमध्ये रविवारी सकाळच्या २४ तासांमध्ये १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बारामती आणि फलटणमध्ये अनेक ओढ्या नाल्यांना पूर आले. बारामतीमध्ये अनेक घरांमध्ये पाणीही शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची 2 पथके रविवारी बारामतीला रवाना झाली.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार