मध्यवर्ती शहरात अरुंद रस्ते, बाजारपेठेमुळे वाहतूक कोंडी होतेच. पण नव्याने वाढणाऱ्या उपनगरांमध्ये वाढलेली लोकसंख्या व वाहनांची संख्या, अपुऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांना रोज सकाळी, सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उपनगरांमध्ये अर्धवट विकसित झालेले डीपी रस्ते, ताब्यात न आलेल्या जागा, निधीचा अभाव याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. महापालिकेने केलेल्या अभ्यासात शहरात सर्वाधिक हडपसरमध्ये ४६ किलोमीटर तर धायरीमध्ये ४० किलोमीटरचे रस्ते कागदावर आहेत.






महापालिकेने मिसिंग लिंक शोधण्यासाठी सल्लागार नियुक्त केला होता, त्यांच्याकडून नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. त्याच प्रमाणे संपूर्ण रस्ता तयार आहे, पण अवघ्या १००, २०० मीटरचा भाग महापालिकेच्या ताब्यात नसल्याने रस्त्याचा वापर करता येत नाही, नागरिकांना मोठा वळसा घालून जावा लागत आहे. शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात २६० किलोमीटरच्या मिसिंग लिंक आहेत. तर समाविष्ट गावांचा डीपी अद्याप तयार झालेला नाही, पण त्या भागातही सुमारे २६० किलोमीटरच्या लिंक असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
अशी आहे स्थिती
– जागतिक पातळीवर वाहतूक कोंडीत पुण्याचा सहावा क्रमांक आहे.
– यावरून पुण्यातील रस्त्यांची स्थिती, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खासगी वाहनांची वाढती संख्या याचे काय गंभीर परिणाम काय होत आहे हे लक्षात येते.
– महापालिकेच्या विकास आराखड्यात नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. पण ते विकसित करण्याचा वेग अतिशय संथ आहे.
– जागा ताब्यात घेण्यासाठी जागा मालकांना रोख मोबदल्याऐवजी टीडीआर आणि एफएसआय देण्यास प्राधान्य दिले जाते.
– पण जागा मालक रोख पैशाचा आग्रह धरत असल्याने डीपीतील रस्त्यांचे काम ठप्प आहे.
शहराचे प्रवेशद्वार कोंडीत
महापालिकेच्या सर्वेक्षणात पुण्याचे प्रवेशद्वार असलेले हडपसर, औंध, वारजे, कर्वेनगर, कोथरूड या शहराच्या प्रवेशद्वारावर पुणेकर रोज वाहतूक कोंडी अनुभवत आहेत. आता याच भागात खूप कमी रस्ते असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. हडपसर ४५ किलोमीटर, औंध २५ किलोमीटर, वारजे-कर्वेनगर २३ किलोमीटर, कोथरूड २३ किलोमीटरचे रस्ते कागदावरच आहेत. पर्यायी मार्ग कमी असल्याने अस्तित्वातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
रस्ते रखडण्याची कारणे
– एकाच वर्षी ठराविक प्रमाणात रस्ते विकसित करण्याचे नियोजन
– प्रशासनाकडे राजकीय तसेच नागरिकांचा कमी पडणारा पाठपुरावा
– अंदाजपत्रकात जागा ताब्यात घेण्यासाठी पुरेशी तरतूद नसणे
– रोख मोबदल्यासाठी जागा मालकांचा आग्रह
– जागा मालकांकडून टीडीआर, एफएसआयचा मोबदला घेण्याबाबत उदासीनता
– जागा मालकांची समजूत काढण्यासाठी वारंवार घ्यावा लागणार बैठका
मिसिंग लिंकची स्थिती
भाग – किलोमीटर
औंध – २५.२४
बिबवेवाडी – २८.३६
वारजे-कर्वेनगर – २३.५६
येरवडा – १८.५०
येवलेवाडी १४.४०
धायरी – ४०
संगमवाडी – २७.९०
कोथरूड -२३
हडपसर – ४६.१४
धनकवडी – ११.४४
ढोले पाटील रस्ता – १५.३०
कर्वे रस्ता – ८.९८
महापालिकेने मिसिंग लिंक शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला. त्यामध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतराचे भूसंपादन न झाले नाही अशा रस्त्यांचे अंतर ७७ किलोमीटर इतके असल्याचे समोर आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अशा मिसिंग लिंक रस्त्यांना जोडण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार आहे.
– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
धायरी भागात धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक असा एकमेव रस्ता आहे. त्याला पर्यायी मार्ग डीपीमध्ये दाखवला आहे, पण तो वर्षानुवर्षे कागदावरच आहे. दरवर्षी ४०-५० लाख रुपये किरकोळ कामासाठी खर्च केला जात असला तरी त्यातून काहीच साध्य होत नाही.











