आगामी काळात राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील हालचालींना देखील आता चांगलाच वेग आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मातोश्री गाठत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातच गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर हर्षवर्धन सकपाळ व उद्धव ठाकरे यांच्या भेटीतच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर भविष्यात एकत्रित आल्या तर आघाडीचा यावेळी बॅकप्लॅन ठरल्याची चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यांनी दोन दिवसापूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटींनंतर चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता येत्या काळात पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य करताना, त्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आले आहे. हे विधान केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागल्यानंतर पवार कुटुंबात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात जर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्या पक्षाशी जुळवून घेतले तर सत्तेबाहेर असलेला हा शरद पवार यांचा गट भविष्यात महायुतीसोबत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच सकपाळ यांनी ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
सकपाळ-ठाकरे भेटीत या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट व अजित पवार गट भविष्यात एकत्रित येतील, यावर चर्चा झाली, असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे दोन्ही गटाच्या एकत्र येण्याच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. ऐनवेळी काही गडबड झाली तर काँग्रेस व ठाकरे गटाने त्यांचा बॅकप्लॅन तयार ठेवला आहे.
दुसरीकडे भविष्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले तर आघाडीतील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ठ्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या अडचणीत भर पडू नये याची दक्षता सपकाळ हे घेताना दिसत आहे. या बॅकप्लॅनवर देखील सपकाळ व शरद पवार भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप आल्यांनतर जर डॅमेज कंट्रोल झालेच तर बॅकप्लॅन तयार ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लोकशाहीला वाचविण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा मुद्दा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सपकाळ यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.