पुणे शहर भाजपा महाराष्ट्र राज्यातील सर्वात पक्की बांधणी म्हणून ज्या कार्यकारणीचा विचार केला जातो ते शहर म्हटलं की हमखास पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे नाव घ्यावं लागतं. पुणे शहर भारतीय जनता पक्षामध्ये पक्की बांधणी असली तरी अंतर्गत संघर्ष आणि स्पर्धा यामुळे कार्यकारणीत कायमच कसोटीचा काळ पाहावा लागतो. त्यातच पुणे शहर भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्याही नियुक्त करायच्या म्हटल्या की शहरांमध्ये असलेले एक केंद्रीय आणि दोन राज्यातील मंत्र्यांचा विचार करणे ही गरज लक्षात घेऊन ज्येष्ठत्वाच्या नात्याने सामंजस्य घडवण्याच्या हेतूने पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष निवड झाली आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील मंडल अध्यक्षांची निवड स्थानिक विधानसभा स्तरावर गणित जुळवत केली परंतु मुख्य निवड ‘शहराध्यक्ष’ करताना सामाजिक समतोल आणि शहरातील नेतृत्वांची पसंती याचा योग्य मेळ घालून सामाजिक समतोल राखत भाजपने धीरज घाटेंची सलग दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी निवड केली. भविष्यातील पक्षांतर्गत वाद (केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्यातील सुप्त संघर्ष) टाळण्यासाठी पक्षाने घाटेंना संधी देत या एकाच निर्णयातून अनेक हेतू साध्य केले आहेत.
पुणे महापालिकेची 2017 मध्ये विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळालेली सत्ता पुन्हा टिकवण्यासाठी अंतर्गत संघर्ष आणि स्पर्धा टिकवणे ही काळाची गरज लक्षात घेऊन पुणे शहर अध्यक्ष निवडीमध्ये सामाजिक समतोल किती आवश्यक आहे याची जाणीव झाल्याने ही फेरनिवड झाली आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने 2017 मध्ये पुणे महापालिकेमध्ये प्रथम भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवणे शक्य झाले. त्यानंतर झालेल्या सत्तांतरामध्येही भारतीय जनता पक्षाने यशस्वी पुणे महापालिकेची सुत्रे सांभाळली. मुळात पश्चिम महाराष्ट्रात कायम शरद पवार आणि अजित पवार यांच्या विचारसरणीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राधान्य दिले जात असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि पक्की बांधणी याच्या जीवावर आपल्या ताब्यात मिळवल्या. महाराष्ट्र राज्यातील या दोन महत्त्वाच्या महानगरपालिका पुन्हा काबीज करताना येणारे धोके लक्षात घेऊन राज्य पातळीवरील नेतृत्वाने खूप खोलवर विचार करत या दोन्ही शहरातील निवडी केल्या आहेत.
मागील दोन महिन्यापासून पुणे शहरात भाजपने शहराध्यक्ष निवड करण्याची प्रक्रिया काही दिवसापूर्वी सुरु केली होती. शहरातून धीरज घाटे यांच्यासह माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या नावांची चर्चा होती. या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना भेटून शहराध्यक्षपदासाठी काम करण्याची इच्छा बोलावून दाखविली होती. तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या बाजूने पर्यवेक्षक व निरीक्षकांपुढे कौल द्यावा, यासाठीही व्यक्तिगत संपर्क साधला होता. महाराष्ट्र प्रदेश निरीक्षकांच्या समोर इच्छुकांच्या मुलाखती आणि विधानसभा स्तरावरती गणिती जुळवण्यासाठी पुणे शहर कार्यकारणीतील प्रमुख तीन चेहऱ्यांनी आपापल्या पसंतीच्या उमेदवारांसाठी आग्रह धरल्याने पुणे शहराध्यक्ष ही निवड अत्यंत किचकट होते की काय अशी शंका निर्माण झाली होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन सध्या इच्छुक असलेल्या नावांमध्ये विधानसभा स्तरावरील संघर्ष लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा धीरज घाटे हेच सर्वांच्या सोयीचे असल्याची गणिते वरिष्ठ पातळीवरती पोहोचवल्याने सलग दुसऱ्यांदा धीरज घाटे यांना संधी मिळाली की काय असेही चर्चा सुरू आहे.
आगामी महापालिका निवडणूक टार्गेट
शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घाटे यांनी पुन्हा एकदा पक्षाकडे संधी मागितली असल्याचे समोर आले. जुलै 2023 मध्ये घाटे यांची निवड झाली होती, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांपेक्षा कमी होता. तसेच या कालावधीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे, यात संघटनेची महत्त्वाची भूमिका आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील अन्य आमदारांनी घाटे यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी भूमिका पक्षाकडे मांडली होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात संघटनेची पुनर्बांधणी करून निवडणुकीसाठी सज्ज होणे आवश्यक आहे. त्यासाठी जुन्या शहराध्यक्षांना संधी देणे पक्षाने पसंत केले.
सामाजिक समतोलचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत भाजपने ब्राह्मण समाजाला संधी द्यावी, अशी मागणी होत होती. यात कोथरूड, कसबा या दोन मतदारसंघांत यापूर्वी ब्राह्मण समाजाने प्रतिनिधित्व केले आहे. महायुतीमध्ये शहरातील आठपैकी सहा मतदारसंघ हे भाजपच्या वाट्याला आले होते. पण त्यात एकाही ठिकाणी ब्राह्मण उमेदवार दिला नव्हता. तसेच नुकतीच २६ मंडल अध्यक्षांची निवड झाली, त्यात कोथरूडमधील एका मंडलाचा अध्यक्ष हा ब्राह्मण समाजाचा आहे. पक्ष संघटनेत सामाजिक समतोल राखत शहराध्यक्षपद ब्राह्मण समाजाकडे देण्यात आले आहे.
घाटे यांच्या नावाबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते बऱ्यापैकी एकमत होते. अन्य इच्छुकांचे शहरातील आमदार, मंत्र्यांसोबत वैयक्तिक मतभेद आहेत. त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर झाला असता. तसेच महापालिकेसाठीच्या तिकीट वाटपातही हा संघर्ष उफाळला असता.