भारतात यावर्षी मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.






गेल्या काही वर्षांतली दुसरी वेळ
दरवर्षी १ जूनच्या तेवढ्यात मान्सून भारतात दाखल होतो. तसेच ८ जूनपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो. मात्र, यंदा तीन दिवस आधी म्हणजे २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. जर अपेक्षेप्रमाणे मान्सून तीन आधी भारतात दाखल झाल्यास, वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची गेल्या काही वर्षांतली ही दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून वेळेपूर्वी म्हणजेच २३ मे रोजी दाखल झाला होता.
महाराष्ट्रात कधी येणार मान्सून?
महाराष्ट्रात मान्सून साधारण ७ जूनपर्यंत दाखल होतो. मात्र, मान्सून जर तीन दिवस आधी केरळात दाखल झाला, तर महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार जवळपास ४ ते ६ जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस
दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या काळातला पावसाचा दीर्घकालीन अंदाज आयएमडीने जाहीर केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंज मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदा मान्सूनला पोषक परिस्थिती असणार आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेमध्ये २०२५ मध्ये १०५ टक्के पाऊस कोसळणार आहे.
मॉन्सूनसाठी लाभदायी स्थिती
महत्त्वाचं म्हणजे प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तटस्थ राहण्याची शक्यता आहे. सरासरीच्या तुलनेमध्ये आयओडीही तटस्थ राहील. यासह उत्तर गोलार्दामध्ये हीम अच्छादनाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, ही परिस्थिती चांगल्या मॉन्सूनसाठी लाभदायी ठरते. त्यामुळे राज्यातसह देशामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं
यंदा सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिकचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कृषी विभागाने वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीबाबत निर्णय घ्यावेत, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात हंगाम कधी सुरु होतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.











