पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने त्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्याने भारताने उत्तराखातर पाकिस्तानच्या मुख्य शहरांना टार्गेट केलं. आता भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं असून दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे. भारताने पाकिस्तानला दणका देत त्यांचे ड्रोन्सदेखील पाडले. पाकिस्तानी चौक्या उध्वस्त केल्या. पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देताना भारताने त्यांना सळो की पळो कारून सोडलंय. मात्र या युद्धात भारताचे दोन जवान धारातीर्थी पडलेत. युद्धात भारताच्या आणखी एक जवानाला वीरमरण आलं आहे.
भारताने आणखी एक सुपुत्र गमावला
यापूर्वी पाकिस्तानने पूछ येथे केलेल्या हल्ल्यात जवान दिनेश शर्मा यांना वीरमरण आलं होतं, पाकिस्तानच्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. देशासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं. आता भारताच्या आणखी एका जवानाला वीरमरण प्राप्त झालं आहे. मुंबईतील घाटकोपर येथील कामराजमगर येथे राहणाऱ्या मुरली श्रीराम नाईक या जवानाचं जम्मू काश्मीरजवळ झालेल्या गोळीबारात निधन झालं आहे. शहिद मुरली नाईक हे मूळचे आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते.
आज ९ मे रोजी पहाटे ३ वाजता मुरली नाईक यांना वीरमरण आलं. मुरली नाईक हे आपल्या कुटुंबासोबत घाटकोपर येथील कामराज नगर येथे राहत होते. त्यांचे घर पुनर्विकासात गेल्याने त्यांचं कुटुंब सध्या आंध्रप्रदेश येथे राहण्यास गेले आहेत. आता मुरली यांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर घाटकोपर येथे त्यांचे बॅनर लावले आहेत. त्यांना स्थानिक आणि मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी होते. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करत शहिद मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.