नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूर घडवत पाकिस्तानाला मोठा दणका दिला. भारतीय हद्दीतूनच पाकिस्तानमध्ये खोलवर हल्ले चढवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण ही गोष्ट करणं तेवढी काही सोप्पी नव्हती. त्यामुळे हे नेमकं कसं घडलं आणि त्याचे नेमके हिरो कोण हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ऑपरेशन सिंदूर खरे तर 5 हिरो आहेत. त्यापैकी कोणी रणनिती आखली तर कोणी गुप्त माहिती काढली. त्यामुळे हे हिरो नेमके कोण?
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑपरेशन सिंदूरचे सर्वोच्च कमांडर
राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यदलांचे सर्वोच्च कमांडर असले तरी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च कमांडरची भूमिका बजावली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण ऑपरेशनची सूत्रं स्वतःच्या हाती घेतली.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांच्या आणि मुलांच्या समोर त्यांच्या घरातील कर्त्या लोकांचा जीव घेतला. “जा आणि मोदींना सांगा.” असं म्हणत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मृत्यूचं तांडवं केलं होतं. दहशतवाद्यांचे हेच शब्द पंतप्रधान मोदींच्या मनाला डागण्या देत होते. त्यामुळेच त्यांनी ठरवलं की, या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दहशतवाद्यांची उरलेली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल आणि दहशतवाद्यांसह त्यांच्या मालकांचा कणा मोडला जाईल.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच सुचवले होते. त्यांनी सैन्याला दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईचे नाव “ऑपरेशन सिंदूर” ठेवण्याचा सल्ला दिला, जो सैन्याने स्वीकारला. ऑपरेशनपूर्वी गेल्या 12 दिवसांत पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि सैन्यदलांसोबत 15 हून अधिक बैठक घेतल्या. ते 7LKM येथून या ऑपरेशनवर सतत लक्ष ठेवत होते. सैन्यदलाच्या प्रमुखांसह रॉ (RAW) चे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यांच्यासोबत सतत संपर्कात राहून त्यांनी या ऑपरेशनला आकार दिला.
2. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल: मुख्य नियोजक
ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण कमांड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या हातात होती. डोवाल हे पंतप्रधान मोदींचे सर्वात विश्वासू व्यक्ती मानले जातात. त्यांनीच हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले. लाहोरपासून 409 किलोमीटर अंतरावर बसून डोवाल यांनी मध्यरात्री दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
डोवाल यांनी सर्वप्रथम रॉ आणि इतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानातील दहशतवादी तळांची संपूर्ण माहिती तयार करण्यास सांगितले. रॉने सैन्य, नौदल आणि वायुसेनेला गुप्त माहिती पुरवली आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांची निवड स्वतः केली. पंतप्रधानांप्रमाणेच डोवाल यांनीही पहलगाम हल्ल्यानंतर 15 हून अधिक बैठक घेतल्या. या हल्ल्याची संपूर्ण योजना डोवाल यांनीच आखली होती.
हल्ल्यादरम्यान पंतप्रधान मोदी रात्रभर जागे होते आणि डोवाल त्यांना प्रत्येक मिनिटाची माहिती देत होते. त्यानंतर सैन्यदलांनी दहशतवादी तळांविरुद्ध वापरण्यासाठी शस्त्रांची निवड केली. वायुसेनेने स्टँड-ऑफ शस्त्रांचा वापर केला, ज्यामध्ये हेरॉन ड्रोन, राफेल विमानांनी SCALP आणि डीप पेनिट्रेशन स्पाइस 2000 मिसाइल्सचा वापर केला. सैन्याने ड्रोन आणि UCAVs द्वारे प्रेसिजन स्पेशल म्युनिशन्सचा वापर केला, तसेच इतर योग्य शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म्सचा समावेश होता.
या सर्व तयारीनंतर भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेनेने संयुक्तपणे हल्ले केले, ज्यामध्ये अनेक लक्ष्यांचा समावेश होता. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांवर हवाई हल्ले करून त्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.
3. रॉ सचिव रवी सिन्हा: गुप्तचर कमांडर
रवी सिन्हा यांनी लष्कर आणि जैशच्या पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांबाबत अचूक माहिती पुरवण्याची जबाबदारी पार पाडली. रॉ आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने 21 दहशतवादी अड्ड्यांची माहिती दिली, त्यापैकी 9 सर्वात महत्त्वाच्या लक्ष्यांवर मिसाइल हल्ले करण्यात आले.
रवी सिन्हा हे 1988 च्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. गुप्तचर संकलन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे श्रेय त्यांना जाते. रवी सिन्हा गुप्तचर समुदायात त्यांच्या व्यावसायिक क्षमतेसाठी आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ रॉमध्ये काम केले आहे आणि यापूर्वी ते रॉच्या ऑपरेशनल विंगचे प्रमुख होते.
4. सीडीएस जनरल अनिल चौहान, सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुसेना प्रमुख मार्शल ए.पी. सिंग आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी ऑपरेशनचे सैन्य कमांडर
पहलगाम हल्ल्यानंतर 11 व्या दिवशी, म्हणजेच 3 मे रोजी दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुसेना प्रमुख मार्शल ए.पी. सिंग आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर पुन्हा एकदा हवाई हल्ले करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच दिवशी आणखी एक बैठक झाली, ज्यामध्ये पाकिस्तानात चालणारे दहशतवादी तळ संपवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ठरले. त्यानंतर तिन्ही सैन्यदलांमधून निवडक अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली.
यापूर्वी, 26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि इतर सैन्यदल प्रमुखांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या दीड तासाच्या बैठकीत पंतप्रधानांनी तिन्ही सैन्यदलांना पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी मोकळीक दिली.
अखेरीस, 6-7 मे च्या मध्यरात्री 1:05 वाजता भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले. अवघ्या 25 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये 7 शहरांमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
5. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री: मुत्सद्देगिरी आणि संवाद कमांडर
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, जे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे विश्वासू सहकारी आहेत, यांना ऑपरेशन सिंदूरसाठी मुत्सद्देगिरी आणि संवाद कमांडरची जबाबदारी देण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आयोजित केलेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेची जबाबदारीही मिस्री यांनी स्वीकारली. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनसारख्या देशांमध्ये भारताची बाजू ठामपणे मांडण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.
मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “या ठिकाणांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती, जेणेकरून कोणत्याही नागरी हानी किंवा गैर-लष्करी पायाभूत सुविधांचे नुकसान होणार नाही.”
मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान डेस्कवर काम केले आहे. ते पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव म्हणूनही कार्यरत होते आणि त्यांनी आय.के. गुजराल, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.