अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून जामिनावर बाहेर असलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचं आज कोल्हापुरात प्रकाशन होत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत येण्याची शक्यता आहे. सनातन संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या विक्रम भावे यांना यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, आपण आणि इतर काहीजण या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा भावे यांनी या पुस्तकातून केला आहे.






विक्रम भावे यांच्या म्हणण्यानुसार, ‘दाभोळकर हत्या आणि मी’ हे पुस्तक केवळ त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचं चित्रण नसून, हे एका निरपराध हिंदू व्यक्तीच्या सत्यनिष्ठेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा दस्तावेज आहे. त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे :
तपासाची दिशा आधीच ठरवली गेली?
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीरपणे हिंदुत्ववाद्यांवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तपासाची दिशा आधीच ठरवून टाकली गेल्याचा आरोप भावे यांनी केला आहे.
लोकशाहीला धक्का देणारा अनुभव :
हिंदुत्ववाद्यांना या प्रकरणात केवळ त्यांच्या विचारधारेसाठी लक्ष्य करण्यात आलं, असा भावे यांचा दावा आहे. हा अनुभव केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरही प्रश्न उपस्थित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा आहे का?”
केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे एवढे भयंकर परिणाम भोगावे लागले, यावर आश्चर्य व्यक्त करत भावे विचारतात की, “या देशात हिंदुत्ववादी असणं हा गुन्हा ठरत आहे का?”
वेब सिरीजसारखा अनुभव :
या प्रकरणातील अटक, चौकशी आणि तुरुंगातील अनुभव इतका नाट्यमय होता की, तो एखाद्या वेब सिरीज किंवा कादंबरीची कथा वाटावी, असं भावे पुस्तकात नमूद करतात.
प्रत्यक्ष आणि पडद्यामागचं वास्तव :
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात प्रत्यक्ष काय घडलं आणि पडद्यामागे काय घडत होतं, याचा सविस्तर लेखाजोखा या पुस्तकात देण्यात आला आहे, असं भावे सांगतात.
या पुस्तकामुळे पुन्हा एकदा डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाची चर्चा रंगणार असून, यामधून नवे पैलू समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, या पुस्तकातील दाव्यांवर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर काय प्रतिक्रिया उमटतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण नेमकं काय?
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सातच्या सुमारास पुण्यात ओंकारेश्वर पुलाजवळ गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते आणि अंधश्रद्धेविरोधात कठोर कायदा आणण्याच्या मागणीसाठी त्यांनी लढा दिला होता.
त्यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने प्रथम पुणे पोलिसांकडे सोपवली होती. मात्र, पुढे या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणात काहीजणांना अटक झाली असून, सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित काही व्यक्तींवर संशय घेतला गेला. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू आहे.











