पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धायरी येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकत २५ ते ३० तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवत ही लुट केली असल्याचं तपासात समोर आलं आहे.
दुकानाचे मालक विष्णू दहीवाळ यांनी यासंदर्भात तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपी फरार झाले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आरोपींनी थरारक दरोडा टाकला. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात श्री. ज्वेलर्सचे दुकान आहे. हे दुकान विष्णू दहीवाळ यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. या दुकानात तीन दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला.नंतर प्लास्टिकच्या बंदूकीचा धाक दाखवून आरोपींनी ज्वेलर्सच्या दुकानातून २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लुटले.
सोने लुटल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. आरोपी फरार होत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी सोने चोरून पळ काढताना दिसत आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.