नागपूर पोलिसांवरील हल्ला क्षम्य नाही. हल्लेखोरांना सोडणार नाही, कबरीतून खोदून काढू असा आक्रमक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिला. उपराजधानीत सोमवारी रात्री झालेल्या दंगलीचा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले व अन्य सदस्यांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हा हल्ला पूर्वनियोजित होते की नाही, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. माहिती घेत आहोत. अजून अंतिम निष्कर्षाला आलो नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त वा मी वेगळे बोलतो, असे नाही. बाकी सर्व बाबी क्षम्य असल्या तरी पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही. निर्धारित कालावधीत हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.






महालमधील दंगलीदरम्यान ‘हल्ला केला, आता घरात घुसू’ अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल झाली. जमावाला चिथावणी देण्यास कारणीभूत ठरलेल्या समाजमाध्यमांवरील अनेक पोस्टपैकी ही कमालीचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट बांगलादेशातून प्रसृत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने सोमवारी औरंगजेबाची कबर खोदण्याच्या मागणीसाठी महालातील गांधीगेट येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे सायंकाळी तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी हिंसाचार उफाळला. जमावाने जोरदार दगडफेक केली. गाड्या जाळल्या. पोलिसांवर हल्ला केला. महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला. हिंसाचार सुरू होण्याआधीपासून समाजमाध्यमांवर अनेक वादग्रस्त व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्या. सायबर पोलिसांना फेसबुकवर एक संवेदनशील पोस्ट आढळली. यात चिथावणी देण्यासह आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. पोलिसांनी या पोस्टचा मागोवा घेतला असता तिचे मूळ बांगलादेशात असल्याचे समोर आले.
शहरातील दंगलीचा सूत्रधार म्हणून फहीम शमीम खान (वय ३८) याचे नाव पोलिस तपासात समोर आले. फरीम हा मायनॉरिटिज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहाराध्यक्ष असून त्याने लोकसभा निवडणूक लढवली होती. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. फहीम संजयबाग कॉलनी, यशोधरनगर येथील रहिवासी आहे. धर्माचा आधार घेऊन फहीमने सोमवारी कट्टर विचारसरणीच्या तरूणांना एकत्र केले. प्रक्षोभक भाषणे देऊन जमावाला हिंसाचार करण्यासाठी चिथावणी दिली, असा त्याच्यावर आरोप आहे.










