मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी ‘बौद्ध भन्तेंकडून बुद्ध वंदना आणि धम्मदेसना’ अभिवादनासाठी उसळला जनसागर

0

महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, जमलेल्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील अनेक मान्यवर आणि आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना ना. पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापूर्ते मर्यादित नसून, ते सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांतून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करुन; आपल्या सर्वांमध्ये स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्माबाबतचे स्फुल्लिंग चेतवले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा अधिकार मिळाला. त्यामुळे अशा महापुरुषाची जयंती प्रत्येकाच्या घरी झालीच पाहिजे, अशी भावना यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या जयंती कार्यक्रमात बौद्ध भन्ते धम्मदर्शना, भन्ते हर्षवर्धन, भन्ते संघानंद, भन्ते बुद्धभूषण, भन्ते आर्याजी यांनी विशेष उपस्थिती लावली. या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना सादर केली. तसेच सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन; धम्मदेसना दिली‌. या कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

यामध्ये माजी आयपीएस अशोक धिवरे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, पल्लवी जावळे, अतुल साळवे, नगरसेवक अविनाश साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दादांच्या या अभिनव पुढाकाराचे आंबेडकर प्रेमींकडून कौतुक करण्यात आले.