राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर फडणवीस यांनी पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पाहिला, त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी कॉरिडॉरबाबत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर ‘पंढरपूर कॉरिडॉर’ला येत्या तीन महिन्यांत कामाला सुरुवात होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.






पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 29 मार्च) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर विभागीय आयुक्त, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत भाष्य केले.
पंढरपूर कॉरिडॉरच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिलेला नाही, त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूरमधल्या कॉरिडॉरबाधितांना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंढरपूर कॉरिडॉरसाठी काही व्यावसायिक जागा, मालमत्ता, काही घरे ताब्यात घ्यावी लागणार आहेत, त्या लोकांचेसुद्धा योग्य पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. कॉरिडॉरबाबतची काही कामे आषाढी यात्रेपूर्वी सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर यामधील काही कामे सुरू होतील, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीत वाद करण्याची गरज नाही. धनगर आणि मराठा असा वाद करणे, योग्य नाही. संभाजीराजे छत्रपती जर म्हणत असतील मी त्यांना वेळ देत नाही, तर त्यांच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांना मी फोनवर बोलतो आणि तसेच मी प्रत्यक्ष भेटत असतो.
कर्जमाफीबाबत अजितदादांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, तीच सरकारची भूमिका आहे. त्यांनी कधीही शक्य नाही, असे बोलले नाहीत, असे म्हणत अजित पवारांच्या भूमिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली.











