महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महामोर्चाचे आयोजन; आनंदराज आंबेडकरांची आंबेडकरी तोफ कडाडली

0

महाड दि. २१ (रामदास धो. गमरे) “बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे, हिंदूंच्या मंदिरात हिंदूच पुजारी आणि त्यांचे व्यवस्थापन, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन फादर आणि त्यांचे व्यवस्थापन, मुसलमानांच्या मस्जिद, दर्ग्यामध्ये मुस्लिम मौलवी आणि त्यांचेच व्यवस्थापन असताना बौद्ध विहारात ब्राम्हणांच अतिक्रमण का ? सरकारने निर्माण केलेला बी. टी. १९४९ हा काळा कायदा रद्द करून महाबोधी महाविहारात ब्राम्हणी कर्मकांडामुळे बुद्धाची जी अवहेलना होते ती थांबावी व आंदोलनासाठी आलेल्या बौद्ध भिख्खू संघावर जो अन्याय होत त्यांची उपेक्षा करीत त्यांना घाणीत बसवले जात आहे हे अन्याय बंद होऊन जागतिक स्तरावर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बिहार बौद्ध व्यवस्थापनाच्या ताब्यात दयावे याकरता बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, जयंती उत्सव मंडळ या सर्वांच्या सहकार्याने धडक महामोर्चा सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवार ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता राणीची बाग ते आझाद मैदान या मार्गे आगेकूच करीत मंत्रालयावर धडक देणार” अशी सिंहगर्जना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ९८ वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिनी महाड येथे अध्यक्षीय भाषणात केली.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच पाणी ही देखील माणसाची मूलभुत गरज आहे परंतु तळागाळातील अस्पृश्य, मागासवर्गीय लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळे येथे मोठी क्रांती घडवली होती, अखंड विश्वाच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला अशी नोंद असलेला भारत हा एकमेव देश आहे, आजमितीस महाड क्रांतीदिनास ९८ वर्षे झाली असून सालाबादप्रमाणे याही वर्षी ९८ वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिन गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता क्रांतिभुमी महाड येथे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस हारपुष्प अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व चिटणीस मनोहर बा. मोरे व सहकाऱ्यांनी अत्यंत सुमधूर वाणीने धार्मिक पूजापाठ संपन्न केला, सदर सभेच्या सुरवातीस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी नेत्रदीपक परेड संचालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली, सदर कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद कृष्णाजी येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून व उपसभापती विनोद मोरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, सदर प्रसंगी महाड तालुका चिटणीस सखाराम जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात सूत्रसंचालन केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी लाघवी शैलीत प्रस्तावना सादर केली तसेच महाड तालुका अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अशोक जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तद्नंतर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, माजी कार्याध्यक्ष व पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपसभापती विनोद मोरे आदी मान्यवरांनी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करून उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंदराज आंबेडकरांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना प्रजासत्ताक भारत देशातील प्रत्येक नागरिकास समान हक्क दिला असताना आजही देशात अनेक अराजारकता माजली आहे, लेकीबळींवर अत्याचार होत आहेत, गरिब व मागासवर्गीयांचे बळी घेतले जातात मात्र सरकार त्याकडे जणू कानाडोळाच करीत आहे, सम्राट अशोकाने भारतात चोऱ्याऐंशी हजार लेण्यांची निर्मिती केली, ठिकठिकाणी विहार बांधली ती गेली कुठं हा प्रश्न उपस्थित झाल्यावर आपल्या लक्षात येईल की त्या सर्व लेणी व विहारांवर सनातनी मनुवाद्यांनी अतिक्रमण करून मूळ बुद्ध स्तूप, मुर्त्या यांना शेंदूर पासून त्यांचे हिंदू देव देवींच्या रुपात रूपांतर करून विहारांवर हिंदू मंदिर बांधून बुद्धाची अवहेलना केली आहे. सद्यस्थितीत बुद्धाचे विचार या देशातून नष्ट करण्यासाठी महाबोधी महाविहारावर अतिक्रमण करून तिथे ही कर्मकांड करण्यात येत आहेत, मागील दोन महिने महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी चाललेले आंदोलन दबावतंत्र वापरून चिरडण्याचे काम सरकार करीत आहे, म्हणून अन्यायी बी.टी. १९४९ अधिनियम बाजूला सारून बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे” असे प्रतिपादन करीत सर्व बौद्धधर्मियांनी महामोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

सदर कार्यक्रमास विठ्ठल जाधव, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपसभापती विनोद मोरे, श्रीधर साळवी, यशवंत कदम, आनंद शिर्के, भगवान तांबे, रवी जाधव, रवींद्र शिंदे व्यवस्थापन मंडळाचे सर्वच सदस्य, विश्वस्त मंडळ, महिला मंडळ व विविध संघटनेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरतेशेवटी सदर अभिवादन सभा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.