विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची नियुक्ती चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उद्यापर्यंत (मंगळवार, ता.25 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उपाध्यक्षपदाची निवड 26 मार्च रोजी होणार आहे. महायुतीमध्ये उपाध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी आमदार राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत आहेत, त्यातून अजितदादा कोणाला संधी देतात, हे पाहावे लागणार आहे.






विधानसभा निवडणुकीत तब्बल 234 पेक्षा जास्त आमदार निवडून आल्याने महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आले आहे. सर्वाधिक 123 आमदार निवडून आलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपपुख्यमंत्री झाले. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ॲड राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे गेल्याने महायुतीमधील कोणत्या पक्षाकडे उपाध्यक्षपद जाणार याची राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद होते.
त्यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली हेाती. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी युतीसोबत गेल्याने झिरवाळ यांच्याकडे उपाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार, याची उत्सुकता आहे.
महायुतीमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे आहे, तसेच विधान परिषदेचे सभापतिपदही भारतीय जनता पक्षाकडे आहे. उपसभापतीपद मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असणार आहे. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्षपद पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे, तशी चर्चाही मध्यंतरी हेाती. मात्र त्याची अद्याप अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र, सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार ते राष्ट्रवादीकडे येण्याची अधिक शक्यता आहे.
विभाग आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विदर्भाला देण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. ते पद भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना हे पद देण्याची चर्चा आहे. दुसरीकडे गेली दोन टर्म पिंपरी मतदारसंघातून निवडून आलेले अण्णा बनसोडे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
अण्णा बनसोडे यांनी कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केलेली आहे. ते आजपर्यंत अजितदादांसोबत कायम राहिले आहे, ते मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने दोन मंत्रिपदे दिल्याने तिसरे मंत्रिपद देणे अशक्य होतं, त्यामुळे अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, अजित पवारांच्या धक्कातंत्राचा विचार करता या दोन नावव्यतिरिक्त एखादे नवे नावही पुढे येऊ शकते.












