‘छावा’ मुळे लोकांच्या भावना प्रज्वलित औरंगजेबाबाबत लोकांचा राग बाहेर..’, नागपूर हिंसाचार निवदेन करताना फडणवीसांचा मोठा दावा

0

औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यातच काल (17 मार्च) रात्री दोन गटात अचानक राडा झाला आणि नागपूरमध्ये हिंसाचार भडकला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात भडकलेल्या या हिंसाचारामुळे विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून सरकारला घेरलं आहे. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज (18 मार्च) विधानसभेत नागपूर हिंसाचारावर सविस्तर निवदेन दिलं. पण याच निवदेनात फडणवीसांनी थेट ‘छावा’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे लोकांमध्ये औरंगजेबाबद्दल जो राग आहे तो बाहेर पडत आहे.’ असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत बोलताना केलं.

‘छावा सिनेमामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाला…’

 विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे, आज महाराष्ट्रात विशेषत: म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाही. खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही मोठ्या प्रमाणात बाहेर येतो आहे.’

‘या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी सयंम राखला पाहिजे. यासोबत मी ही देखील चेतावणी देतो की, कोणीही याठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात-धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांवर कोणी केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

नागपुर हिंसाचार का भडकला? फडणवीसांचं निवेदन जसंच्या तसं…

काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. यानंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114 – 2025 नुसार भारतीय न्यायसंहिता 299, 37 (1) (3) सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी हा गुन्हा दाखल केला.

यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की, सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. दरम्यान, नमाज आटोपून 200 ते 250 जणांचा जमाव त्याठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.

यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये आमंत्रित करण्यात आलं, त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्याच्ंया तोंडावर फडके बांधले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे. काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.

तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7.30 वाजता झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रूधूर आणि पोलीस बळाचा वापर करावा लागला. या घटनेत दोन जेसीबी आणि काही चारचाकी वाहने ही जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातील एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे.

एकूण 5 नागरिक जखमी झाले आहेत. तिघांना उपचार करून सोडलं आहे आणि दोन रुग्णालयात आहे आणि त्यापैकी 1 जण आयसीयूमध्ये आहे.

एकूण 3 गुन्हे गणेश पेठ पोलिसात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत. अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉईंटवर नाकबंदी करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्याचा पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

एकूणच यामध्ये आपण पाहिलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती. पण त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येत आहे. याचं कारण म्हणजे एक ट्रॉलीभरून दगड मिळाले आहेत. काही लोकांनी वर जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात होते. ती शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

ठरवून काही घरांना, काही आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. डीसीपी दर्जाचे लोकं जखमी झाले आहेत. यामुळे निश्चितपणे यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतोय.

कुठल्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे. नागपुरातील किंवा महाराष्ट्रातील जनता असेल.. या सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की, सर्व समाजाचे धार्मिक सण या कालावधीमध्ये चालले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीत सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. असं अपील मी यानिमित्ताने करतो.