औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत, नागपूरमध्ये काल विहिंप आणि बजरंगदलने आंदोलन केलं. या आंदोलनानंतर शहरात संध्याकाळी तणाव निर्माण झाला. वाद वाढला आणि काही वेळ हिंसाचार झाला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिलं. हिंसाचाराच्या मुळाशी असलेल्या अफवांचा संदर्भ देत मुख्यमंत्री यांनी सविस्तर निवेदन दिलं.
नागपूरमध्ये काल संध्याकाळी एक अफवा पसरली आणि प्रतिकात्मक कबरीवर ठेवलेल्या पत्र्यावर धार्मिक चिन्ह असल्याचं सांगण्यात आलं. या अफवेमुळे प्रकरण तापलं आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या.
काही जणांवर तलवारीनं हल्ला…
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, घटनास्थळी 80 ते 100 लोक जमा झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात 12 दुचाकींचं नुकसान झालं. एक क्रेन आणि दोन जेसीबीसह चारचाकी गाड्या जाळल्या. यावरून हिंसाचाराचे गांभीर्य लक्षात येते. याशिवाय काही जणांवर तलवारीनंही हल्लाही करण्यात आला.
हिंसाचारात 33 पोलीस जखमी झाले असून, त्यात 3 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच 5 नागरिकांवरही हल्ले झाले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले असं फडणवीस म्हणाले. हा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. काही घरांना, अस्थापनांना ठरवून टार्गेट करण्यात आलं असंही फडणवीस म्हणाले.
11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमाबंदी…
या संपूर्ण घटनेसंदर्भात 5 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यासोबतच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं. राज्य सरकार या प्रकरणी कठोर कारवाई करेल आणि दोषींना सोडले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. पोलिसांनी उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले आणि या हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं.