उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मोठे विधान केले आहे. ते करताना त्यांनी विरोधी पक्षांना ‘विरोध करू नका’ असे आवाहन करत ‘आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही चूक दुरुस्त करू,’ असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी आज चौफेर फटकेबाजी केली. शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंतराव पाटील, ते काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम, अमित देशमुख यांच्यापर्यंत सर्वांवर हल्लाबोल केला. त्यातून विरोधी पक्षाचा एकही नेता सुटला नाही.
कर्ज काढून प्रकल्प पूर्ण करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे सांगताना त्यांनी किंमती वाढत जातात आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडचण येतात, हे सांगून राज्यावरील कर्जाच्या बोज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी समर्थन केले. पुढे जाण्यासाठी कर्ज काढावंच लागते. कमी व्याजाने कर्ज मिळत असेल तर ते घेऊन काम केलंच पाहिजे, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, समृद्धी महामार्ग आज बांधून पूर्ण झालेला आहे. काही लोकांनी त्यावेळी विरोध केला होता, आम्हीही त्यामध्ये होतो. आम्हाला शेतकरी म्हणायचे, ‘नाही नाही आम्हाला विरोध करायचा आहे.’ मी, जयंतराव पाटील व इतरही नेतेमंडळी त्या सभागृहात जमलो होतो. मोठ्या प्रमाणात सातबारा गोळा करून आणले होते.
जेव्हा या महाराजांनी…देवेंद्र फडणवीस यांनी संपादीत जमिनीचा मोबदला चारपटचा पाचपट जाहीर केला. आमच्यासोबत आंदोलन करणारे सगळे शेतकरी तिकडे गेले आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार आहे, त्यामुळे विरोध करू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विकास करायचं म्हटलं तर हवेत विमानतळ, रस्ते, शहरं होत नाही, आपल्याला हे सर्व जमिनीवरच करावं लागतं. त्यामुळे आपण जरी विरोधी पक्षात असला तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या. विकास कामांच्या बाबत हातात हात घालून पुढे चाला. आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा. आम्ही चूक दुरुस्त करु, असे सांगून अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध सोडण्याचे विरोधकांना आवाहन केले.