विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. रविवारी, भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे. महायुतीच्या या नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीसाठी कमी कालावधी मिळणार आहे.
महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. विरोधकांकडून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार नसल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा अर्ज आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.
महायुतीचे उमेदवार कोण?
भाजपकडून रविवारी आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोणाला किती कार्यकाळ?
संविधानातील तरतुदीनुसार, विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह विधान परिषद ही विधानसभेसारखी विसर्जित होत नाही. विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या जागांवर त्या-त्या जागांप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात. विधान परिषदेतील आमदारांचा कार्यकाळ हा 6 वर्षांसाठी असतो. आता रिक्त झालेल्या पाच जागांवरील आमदारांचा उर्वरित कार्यकाळ या नवनिर्वाचित आमदारांना मिळणार आहे.
भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे.
नवनियुक्त पाच आमदारांचा कार्यकाळ-
- भाजपच्या या तीन उमेदवारांना 14 ते 16 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
- शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी यांना 4 वर्षांसाठीचा कार्यकाळ मिळणार आहे.
- राष्ट्रवादीचे उमेदवार संजय खोडके यांना तब्बल (5.5) साडे पाच वर्षांच्या आमदारकीचा कार्यकाळ मिळणार आहे.