आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस या पक्षांकडून येत्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयार केली जात आहे. त्यातच आता महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सध्या अनेक आमदारांमध्ये खदखद असल्याचे बोलल जात आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. शपथ घेऊनही त्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप केले. तसेच नाना पटोले यांनी मतदारसंघात काय चाललंय, याबद्दल कधीच विचारलं नाही”, असा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार
“तिकीट द्यायचं नसेल तर देऊ नका. पण बदनाम करु नका. मी याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. तसेच पक्ष श्रेष्ठी हे माझी बदनामी करत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार अध्यक्षांवर नाराज असून त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे”, असेही हिरामण खोसकर यांनी म्हटले.
“विधान परिषद निवडणुकीत मी महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. याबद्दल मी शपथ घेऊन सांगितलं, तरी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ज्यांचे मत फुटले, त्या 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप करण्यात आला. मला उमेदवारी द्यायची नसेल तर नका देऊ, पण बदनाम करू नका. पक्षश्रेष्ठींकडून माझी बदनामी होत आहे आणि हे चांगलं नाही”, असेही हिरामण खोसकर म्हणाले.
नाना पटोलेंविरोधात वरिष्ठ नेत्यांना तक्रार
“पक्षश्रेष्ठींनी मला एकदाही विचारलं नाही की मतदारसंघात काय चाललाय. ते भेटले की फक्त असं का केलं आणि तसं का केलं, इतकंच विचारतात. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. मी त्यांची नावं सांगणार नाही. पण अनेक आमदारांनी नाना पटोलेंबाबत वरिष्ठ नेत्यांना तक्रार केली आहे, असा खुलासाही हिरामण खोसकर यांनी केला. जर मला उमेदवारी दिली नाही, तरी मी थांबणार नाही. कार्यकर्त्यांशी बोलून मला पुढची भूमिका घ्यावी लागेल”, असेही ते म्हणाले.