आजची स्त्री निर्भयपणे व आत्मविश्वासाने जगते ही बाबासाहेबांची देणं आहे – प्राचार्या यशोधरा वराळे

0

मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्वच स्तरातील महिलांच्या न्यायहक्कांसाठी हिंदू कोड बिल ११ एप्रिल १९४८ आणले होते परंतु नेहरू सरकारने त्या बिलास विरोध करून ते नाकारले म्हणून महिलांच्या न्यायहक्कांसाठी बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आज महिलांना मॅटरनिटी लिव्ह (प्रसूती रजा),वारसाहक्क, मतदानाचा अधिकार, ओळखहक्क, बारा तासांऐवजी आठ तासाची ड्युटी, बोनस, घटस्फोट घेण्याचा अधिकार, घटस्फोटानंतर पोडगी मिळण्याचा अधिकार, स्वतःच्या शरीरावर व पोटातील गर्भावर अधिकार तसेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे सर्वच अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मिळाले आहेत, अनिष्ट रूढी-परंपरांच्या बेड्या तोडून आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केले म्हणूनच आजची स्त्री निर्भयपणे व आत्मविश्वासाने जगते ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची देणं आहे” असे प्रतिपादन प्राचार्या यशोधरा वराळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्यक्ता या नात्याने बोलत असताना केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने जागतिक महिला दिन सुशीलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे व महिला मंडळ सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी अत्यंत प्रभावीपणे व लाघवी शैलीत केले तसेच कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी प्रास्ताविक सादर करताना कार्यक्रमाचे ध्येय व उद्देश व त्यामागील बौद्धजन पंचायत समितीची भूमिका नमूद केली. प्रथमच रफी अहमद कीडवाई मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी योगायोगाने कार्यक्रमास उपस्थिती लावून त्यांनी आजकाल होणारे ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन गेम्स, लोन याद्वारे होणारे सायबर क्राईम, आपण क्षणाक्षणाला सोशल मीडियावर पोष्ट, रिल्स, स्टोरी, स्टेटस अपलोड करत असल्याने सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन घरफोडी, प्रवासात लूटमार, स्कीम-ऑफर देऊन फसवणूक कशी करतात याची माहिती, फोनचा अतिरेकी वापर यामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम म्हणून मुलं किती आणि कशाकरीता मोबाईल वापरतात याकरता पालकांनी घ्यायची खबरदारी, रात्री उशिरापर्यंत आपली मुलं जर का घराच्या बाहेर वावरत असतील.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

वाईट संगत, गुन्हेगारी मित्रपरिवारात रमत असतील तर आपल्या मुलांची नावे भविष्यात पोलीस रेकॉर्डवर येऊ नये म्हणून पालकांनी वेळीच लक्ष राहून घ्यायची काळजी, माय भगिनींनी दागिने घालून बाहेर जाताना घ्यायची योग्य ती काळजी व काही वाईट प्रसंग घडलाच तर न भिता पोलीस स्टेशनमध्ये कश्या पद्धतीने तक्रार दाखल करायची, अनोळखी फोनवर कोणतीही माहिती, ओटीपी देऊ नये, सायबर गुन्हा झाल्याचे लक्षात आल्यास तात्काळ १९३० या नंबरवर संपर्क साधुन तक्रार करणे या सर्वांची तपशीलवार माहिती देऊन उपस्थितांना व अखिल महिलावर्गाला जगतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तद्नंतर प्रमुख पाहुण्या मनिषाताई आनंदराज आंबेडकर या मार्गदर्शनपर भाषणात “पुण्यातील स्वारगेट येथे घडलेला प्रसंग पुन्हा कुठे घडू नये याकरिता महिलांनी अबला न बनता सबला बनणे आवश्यक आहे स्वतःच्या मुलींना स्वसंरक्षणासाठी ज्यूडो, कराटे, मार्शल आर्टस् शिकवून निर्भयपणे प्रतिकार करण्यास शिकवले पाहिजे” असे सूचित केले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे यांनी ही शुभेच्छापर विचार मांडत असताना “आनंदराज आंबेडकर साहेब दिल्लीस असल्याने हजर राहू शकले नाही परंतु त्यांनी निश्चित केले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील पहिले सात मजली स्मारक जे आता पूर्णत्वास येत आहे त्यातील एक संपूर्ण दालन हे महिलांना उद्योगाकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच शासकीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या योजना, GR यांचा महिलांना लाभ घेता यावा अधिकाधिक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून उद्योजिका म्हणून नावारूपास यावयात याकरता प्रयत्न केला जाईल, एक शिष्टमंडळान अनेक उद्योजकांकडे जाऊन माहिती गोळा करून महिलांना सक्षम करण्यासाठी पुढील कामकाज करतील व त्यादृष्टीने कामास सुरवात ही करण्यात आली आहे” अशी माहिती देत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, सोबतच सुशीलाताई जाधव व काका खंडाळकर यांनी ही शुभेच्छापर विचार व्यक्त करून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

सदर कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती मध्यवर्ती महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी, व्यवस्थापन मंडळ, त्यांचे सदस्य, सभासद, विभागीय कार्यकारिणी, कार्यकर्ते, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध शाखांचे पंचपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून अंजलीताई मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.