पुण्यात पुन्हा आमदारकीची चढाओढ? 27 मार्चला मतदान; संधी दीपक मानकर की जगदीश मुळीक? महायुतीत रस्सीखेच

0
4

महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेच्या रिक्त निवडणुकीची घोषणा करण्यात आली. मुंबईमध्ये घोषणा होताच पुण्यातील वातावरणामध्ये बदल होत महायुतीतील मित्र पक्षांमध्येच अंतर्गत संघर्ष आणि सुप्त इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे. मुळात पुणे शहरातील प्रमुख दावेदार असलेल्या दीपक मानकर आणि जगदीश मुळीक यांना लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही निवडणुकीमध्ये पक्ष आदेश मान्य करत अन्य उमेदवारांचे प्रचार करण्याचे काम करावे लागले. पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या दोन्हीही नेत्यांनी आपल्या पक्षाशी बांधिलकी दाखवत पुणे लोकसभेची हक्काची जागा विजयी करण्यास मोलाचे योगदान दिले आहे. परंतु पुणे शहरातील हक्काचा बालेकिल्ला असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांना आपल्या ताब्यात न राखता आल्याने शहराध्यक्ष म्हणून दीपक मानकर आणि स्थानिक भाजपा चे नेतृत्व व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक या दोघांच्या कारकीर्दीला हा पराभव चिटकून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पुणे महापालिकेवर सर्वाधिक(२२) नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून देण्यात जगदीश मुळीक यांचे मोलाचे योगदान होते. त्याच जनादाराच्या विश्वासावर स्वतः जगदीश मुळीक यांनी अगोदर पुणे लोकसभा आणि नंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली परंतु काही कारणास्तव त्यांच्या पदरी अपयश आले असले तरीसुद्धा पक्ष कार्याला सर्वोच्च मानत आजही जगदीश मुळीक यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचे काम त्यात हिरारीने केले जात आहे. परंतु वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे माजी आमदार विजयी झाल्याने विधान परिषदेची संधी मिळते की पुन्हा एकदा नव्या संधीची वाट पाहावी लागणार आहे याबाबतचे चित्र काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने जगदीश मुळीक यांना संधी देणे क्रमप्राप्त आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर संपूर्ण पुणे शहरात सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वात मोठी कार्यकारणी तयार करण्याची किमया दीपक मानकर यांनी केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दीपक मानकर यांना संधी द्यावी असे वाटत आहे. त्याच विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. विधानसभा परिषदेचे काही सदस्य हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने 5 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस राजेश विटेकर, भाजप आमदार प्रवीण दटके, भाजप गोपीचंद पडळकर आणि भाजपा रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आता, या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आह. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर याच महिन्यात निवडणूक होणार आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी मिळावी यासाठी पुण्यात पुन्हा चढाओढीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपकडून जगदीश मुळीक यांचं नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक मानकर यांची पुन्हा दावेदारी असल्याची माहिती आहे. गतवर्षी विधानपरिषद निवडणुकीत मानकर इच्छुक होते. मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे यांना संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दीपक मानकर यांनी गेल्यावेळी संधी नाकारली. मात्र यावेळेस आपला विचार करावा, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. दीपक मानकर यांनी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर ही मागणी केली असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

‘अजित पवार हे योग्य निर्णय घेतील’, मानकर

दीपक मानकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “विधानपरिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केला आहे. इतके दिवस ज्या पद्धतीने मी पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहे याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून जे काम मी उभं केलं आहे ते अजित पवार यांना माहिती आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठं काम हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून पुण्यात करण्यात आलं आहे. सध्या 1500 जणांची कार्यकारणी पुण्यामध्ये कार्यरत आहे”, असं दीपक मानकर यांनी सांगितलं.

“संघटनेच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभेला चांगलं काम केलं आहे. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या मागे पक्ष हा कायम उभा राहतो. अजित दादांना माझ्या दावेदारीबद्दल मी सांगितलं असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. त्यांनी मला संधी दिली नाही तरी मी अजित पवार यांच्या सोबतच राहणार”, अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी दिली.