सर्व पाणीपुरवठा स्त्रोतांचे नियमित क्लोरीनेशन करून त्यावर देखरेख ठेवा; जीबीएसबाबत उपाययोजनेचे दिले आदेश

0
1

राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) – पुणे महानगरपालिकेला सक्त सूचना जीबीएस निर्बंध करिता तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.‌ राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात फेब्रुवारी २०२५ अखेर संशयित रुग्णांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः खडकवासला मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यामुळे याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.

आज महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना दरम्यान चर्चा उपस्थित केली. त्यांनी खडकवासला मतदारसंघातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी, प्रशासनाची प्रत्यक्ष पाहणी व उपाययोजना यासंबंधी प्रश्न विचारले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देताना सांगितले की, खडकवासला मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ तपासणी मोहीम हाती घेतली. या भागातील पाणीपुरवठा स्रोतांची तपासणी करण्यात आली असता, पुणे महानगरपालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात क्लोरीनेशन प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आल्या. यामुळे पाणीपुरवठा दूषित होऊन रुग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्री महोदयांनी स्वतः पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली असता, महानगरपालिकेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सक्त सूचना देण्यात आल्या असून, पुढीलप्रमाणे तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

-सर्व पाणीपुरवठा स्त्रोतांचे नियमित क्लोरीनेशन करून त्यावर देखरेख ठेवणे.

-दूषित पाणीपुरवठा भागातील पाणी नमुन्यांची तातडीने तपासणी करणे.

-संशयित रुग्णांच्या लक्षणांवर त्वरित उपचारासाठी आरोग्य पथके तैनात करणे.

-स्थानिक नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवणे.

राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, या परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.