काही दिवसांपूर्वी पुण्यात पुन्हा एकदा गजानन मारणे टोळीचा उन्माद दिसून आला होता. केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे ही आरोपी आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यातून आयटी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती.
नेमकं काय झालं होतं?
देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला, असं म्हणत जोग यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
गजा मारणेचा भाचा फरार
मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: जोग यांची भेट घेतली अन् विचारपूस केली होती. या प्रकरणात पोलिसांनी चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी बाबू पवार हा फरार झाला आहे. बाबू पवार हा गजा मारणे याचा भाचा आहे. त्यामुळे आता मामा भाचे अडचणीत सापडल्याचं चित्र पहायला मिळतंय.
पुणे पोलिस डोळे बंद करून बसलेत का? – मुरलीधर मोहोळ
दरम्यान, पुणे पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का? तरुण पिढीनं यातून काय घ्यायचं? माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी विचारला होता. सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, अशा शब्दात मोहोळ यांनी पुणे पोलिसांना सुचना दिल्या होत्या.