दिल्लीमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमादरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली लागली आहे. ठाकरे यांच्या पक्षात मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं, असा गौप्यस्फोट गोऱ्हे यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. पुण्यात देखील ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने नीलम गोऱ्हे यांच्या घरावर आक्रमकपणे निदर्शने व आंदोलन करण्यात आली.
यावेळी ”नीलम गोऱ्हे यांनी स्वतःची इनोवा गाडी आमच्या गट नेत्याकडून घेतली आहे आणि दोन वर्षानंतर त्यागाडीचे टायर आमच्या पदाधिकाऱ्याकडून घेतलेले आहेत. तसेच पक्षातील महिलांना कायम निलम गोऱ्हे यांना साड्या द्याव्या लागतात. त्यामुळे कायम मागणाऱ्याना कधी काही द्यायची सवय नाही आणि या काय मर्सिडीज देणार?” असं सवाल या आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला.
तसेच नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी दिली उपसभापतीपद दिले. मग यांनी पाचवेळा मर्सिडीज दिली असेल तर पावत्या दाखवाव्या. बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल बडबड करू नये. शिंदे गटात कोणी विचारत नाही. पुढील आमदारकी मिळवण्यासाठी काहीतरी बोलले पाहिजे म्हणून बोलताय का ? असा सवाल महिलांनी विचारला.
या आक्रमक आंदोलनानंतर ठाकरे गटाचे शहरातील नेते वसंत मोरे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नीलम गोर्हे यांच्यावर टीका केली. वसंत मोरे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधानपरिषदेत “लक्षवेधी” मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव साहेबांना मर्सिडीज काय देणार? असा उपरोधक सवाल वसंत मोरे यांनी केला. तसेच, २०१२ पासून ते २०१७ पर्यंत शिवसेना नेत्याने तोंड उघडले तर ताई तुम्ही कुठे असाल?… असा सूचक इशारा देखील वसंत मोरे यांनी दिला.