विधानसभेची मिनी निवडणूक स्वबळास बाह्या सरसावल्या, पालिका निवडणूक स्वबळावर? महायुती पुन्हा झुंजणार?

0

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये आतापासूनच खटके उडायला सुरूवात झालीय. भाजप स्वबळावर लढणार असेल तर आम्हीही स्वबळावर लढायला तयार असल्याची डरकाळी शिवसेनेकडून फोडण्यात आलीय. बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्था भाजप स्वबळावर लढेल असं वाटत नाही, असे शिवसेना नेते मंत्री उदय सामंत म्हणाले. तर भाजप स्वबळावर लढले तर आम्हीही स्वबळावर लढू, असे संजय शिरसाट म्हणाले.

… तर आम्हीही स्वबळावर लढू, शिंदे शिवसेनेची घोषणा

सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वेध लागलेत. महायुतीतील काही नेत्यांनी तर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर लढू असं स्पष्ट केलंय. भाजप जर स्वबळावर लढणार असेल तर आम्हीही स्वबळावर लढू असं शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. सगळ्याच महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांवर जोर देत ‘कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्हाला मान्य करावं लागेल’ असे सांगितले आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा ताकदीनं दिलाय. तर महायुतीनं एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं, यावर भर देणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा स्वबळाची भाषा वापरली जाते, असा टोला भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षांना लगावला.

निवडणुकीची घोषणा होण्या आधीच महायुतीत स्वबळाच्या बाह्या सरसावणं सुरू

मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. तर 22 जिल्हा परिषदांच्याही निवडणुका झालेल्या नाहीत. महापालिका निवडणुका कधी होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र निवडणुकीची घोषणा होण्या आधीच महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाच्या बाह्या सरसावणं सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर राज्यातील किती महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

कोणकोणत्या महापालिकांच्या निवडणुका रखडल्या?

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

एकंदरीतच महापालिकेच्या या निवडणुका म्हणजे एक प्रकारे विधानसभेची मिनी निवडणूकच मानली जातेय. आता ही निवडणूक स्वबळावर लढवली जाते की महायुती एकत्रितपणे लढते, हे लवकरच स्पष्ट होईल.